पुणे ते महाबळेश्वर क्लासिक फियाट रॅलीचे आयोजन:फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे २० हून अधिक गाड्यांचा सहभाग




फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे शनिवारी पुणे ते महाबळेश्वर दरम्यान क्लासिक फियाट कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत १९५५ पासूनच्या विविध मॉडेल्सच्या २० हून अधिक देखण्या फियाट गाड्या सहभागी झाल्या होत्या. चमकदार क्रोम आणि आकर्षक डिझाइन असलेल्या या गाड्यांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या गाड्यांमध्ये गोलाईदार बॉडी, शांत पण दमदार इंजिन, हलके स्टिअरिंग, हॅन्डगिअर, क्लासिक ग्रील आणि लक्षवेधक हेडलाईट्स ही वैशिष्ट्ये होती. पुणे शहरातून मार्गक्रमण करत हा ताफा निसर्गरम्य महाबळेश्वरकडे रवाना झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी हा ताफा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अनेक ठिकाणी नागरिकांनी या गाड्यांचे छायाचित्रण करून सहभागी वाहनचालकांना दाद दिली. यावेळी आयोजक संजय प्रकाश ढेरे यांनी सांगितले की, क्लासिक वाहनांचा वारसा जतन करणे आणि तरुण पिढीला या गाड्यांविषयी आकर्षण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा रॅलींमुळे वाहनप्रेमी एकत्र येतात आणि ऐतिहासिक वाहनसंस्कृती जिवंत राहते. ढेरे यांनी माहिती दिली की, १९५५ पासूनच्या विविध मॉडेलच्या फियाट कार असलेले सदस्य हा क्लब चालवतात आणि काळ्या, निळ्या, लाल, पांढऱ्या, हिरव्या अशा विविधरंगी व्हिंटेज कार घेऊन महाबळेश्वर, गोवा, मुंबई, बंगळुरू, कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी भेटी देतात. रॅलीतील एक सहभागी शीतल सोनकांबळे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे १९९१ मधील फियाट कार आहे. ही कार त्यांच्या कुटुंबासाठी केवळ एक वाहन नसून आठवणींचा ठेवा आहे. अनेक वर्षे जपून ठेवलेल्या या गाडीची देखभाल ते स्वतः करतात. अशा रॅलीत सहभागी होताना या गाडीचा खरा आनंद अनुभवता येतो, असेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या उत्सुक नजरा आणि कौतुकाचे शब्द हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *