![]()
सोलापुरात एक मनाला चटका लावणारी, पण तेवढीच प्रेरणादायी घटना घडली आहे. दहावीच्या पहिल्या पेपरला निघालेल्या एका मुलीला ऐनवेळी आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी कळली. यामुळे क्षणभर तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिच्या आयुष्याचा आधार हरपला होता. पण त्याही स्थितीत तिने आपले दुःख बाजूला सारत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने परीक्षा केंद्र गाठून आपला पेपर दिला. यासाठी तिला तिच्या शिक्षकांनी मोठी मदत केली. धनश्री भिकाजी पवार असे या धाडसी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शहरातील शरदचंद्र पवार प्रशालेची दहावीची विद्यार्थिनी आहे. शुक्रवारी तिचा मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी 10 वा. ती सोलापुरातील भू. म. पुल्ली कन्या प्रशाला परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी निघण्याची तयारी करत होती. त्याचवेळी रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या तिच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिला समजली. या कठीण प्रसंगात परीक्षा देण्याची तिची मानसिकता नव्हती. ती घरातच ओक्साबोक्सी रडत होती. मुख्याध्यापकांनी धीर दिला अन् धनश्री परीक्षा केंद्रावर पोहोचली धनश्रीच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिच्या शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांच्या कानावरही पोहोचली. त्यांनी तत्काळ वेळ न दवडता धनश्रीच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी तिला धीर दिला. तसेच तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांनी तिच्या कुटुंबीयांना विश्वासात घेतले. तसेच धनश्रीला वर्ष वाया जाऊ न देता परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तिला घेऊन ते स्वतः परीक्षा केंद्रावर पोहोचले. शिक्षकांचे पाठबळ मिळताच धनश्रीने आपले दुःख बाजूला ठेवत मराठीचा पहिला पेपर दिला. यावेळी केंद्रप्रमुख गीता सादूल यांनीही तिला मोठा धीर दिला. हा पेपर देताना तिला अनेकदा वडिलांच्या आठवणीने हुंदका दाटून येत होता. पण त्याही परिस्थितीत तिने आपला पेपर सोडवला. पेपर दिल्यानंतर धनश्री रडतच घरी पोहोचली. तिने वडिलांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर भिकाजी पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यंदा 16,15,489 विद्यार्थी देत आहेत परीक्षा यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 65 हजार 740 मुले, 7 लाख 49 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील 23 हजार 683 शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, 5 हजार 111 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. राज्यभरात 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्याही कार्यरत आहेत. परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे परीक्षा प्रक्रिया कैमेराबद्ध केली जाणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, 1982 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असून, हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दहावीच्या पेपरला जाताना वडिलांचे निधन:कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही मुलीने दिला पेपर; सोलापूरची हृदयद्रावक घटना
