जन्मतारीख दुरुस्तीसाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला रंगेहात अटक


नांदेड (प्रतिनिधी)- येथील महात्मा कबीर विद्यालय, सहयोग नगर येथे दहावीच्या सनदवरील जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या पूर्वी कंधार येथे काल दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी लाच प्रकरणातील मुख्याधापक महिले सह इतर दोन शिक्षकांची पोलीस कोठडी समाप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने सन २०१६ मध्ये महात्मा कबीर विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र, दहावीच्या सनद वरील जन्मतारीख चुकीची असल्याने ती दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने शाळेतील शिक्षक मनोहर अर्जुनराव शिंदे (वय ४५) यांच्याशी संपर्क साधला. जन्मतारीख दुरुस्त करून देण्यासाठी शिंदे यांनी सुरुवातीला एक हजार रुपये घेतले. त्यानंतर फोन-पे द्वारे आणखी २२०० रुपये घेतले.

यानंतर २७ जानेवारी रोजी जन्मतारीख दुरुस्तीसाठी आणखी ४०० रुपयांची मागणी व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे करण्यात आली. ३० जानेवारी रोजी तक्रारदाराच्या वडिलांना शाळेत पाठवण्यात आले असता, शिक्षक शिंदे यांनी जन्मतारीख दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे सांगत आणखी ४४०० रुपयांची मागणी केल्याचे समोर आले.

या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी मागणीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, शाळेत सनद मिळाल्यानंतर शाळेतील शिपाई सचिन सतीश शिवरामवार (वय ३९) यांनी शिक्षक शिंदे यांच्या सांगण्यावरून ४०० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यावर शिंदे यांनी फोन-पे द्वारे व्यवहार करण्यास सांगितले तसेच शिपाईच्या मोबाईलवर पैसे पाठवण्यास सांगितले.

यानंतर ३ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. महात्मा कबीर विद्यालयात शिक्षक शिंदे व शिपाई वार यांनी तक्रारदाराकडून ४०० रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान शिक्षकाच्या खिशात ६०० रुपये तर शिपायाकडे १५९० रुपये रोख रक्कम आढळून आली.

या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाची तक्रार पोलीस निरीक्षक अर्चना करपुढे यांनी दिली असून आरोपी शिक्षक मनोहर अर्जुनराव शिंदे आणि शिपाई सचिन सतीश शिवरामवार यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक राहुल तरकसे करीत आहेत.

Post Views: 93






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *