नांदेडमध्ये १५,५६९ बनावट जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा

झारखंडमधून पाच जण अटकेत; मास्टरमाइंड बिहारचा

नांदेड (प्रतिनिधी) – डिजिटल प्रणालीचा गैरवापर करत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावळेश्वर (लोकसंख्या सुमारे १५००) या गावाच्या नावावर तब्बल १५ हजार ५६९ बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी झारखंडमधून पाच आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधार बिहारमधील असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी पोलिसांचे विशेष पथक बिहारकडे रवाना झाले आहे.

किरीट सोमय्यांनी केला होता भांडाफोड

सुमारे १५ दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड दौऱ्यात हा प्रकार उजेडात आणला होता. झारखंडमधील एका व्यक्तीने सावळेश्वर येथून काढलेले जन्म प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे समोर आल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सुरुवातीला उस्माननगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर तपासातून आरोपी जाळ्यात

तपासाची सूत्रे लोहा येथील पोलिस निरीक्षक नवनाथ आयलाने यांच्याकडे सोपविण्यात आली. सायबर पथकाच्या मदतीने झारखंडमधील गढवा येथून जितेंद्र कुमार सिंह, महेंद्र प्रताप सिंह, ओमप्रकाश मिश्रा, लक्ष्मी पंडित, सुमित कुमार सिंह आणि सतीश कुमार साहू यांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून चौकशी सुरू आहे.

सीआरएस पोर्टल हॅक

तपासात उघड झाले की, Civil Registration System (CRS) पोर्टलवरील सावळेश्वर ग्रामपंचायतीचा यूजर आयडी आणि पासवर्ड झारखंडमधील आयपी अॅड्रेसवरून हॅक करण्यात आला होता. मे ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत १५ हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली.

या रॅकेटमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप, दलाल आणि काही सायबर कॅफे चालकांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

अनेक राज्यांत विस्तार

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांपर्यंत या रॅकेटची व्याप्ती असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *