![]()
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या महत्त्वपूर्ण पदावर अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून जारी करण्यात आले असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पक्ष संघटनेचे कार्य अधिक प्रभावी, गतिमान आणि सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी तसेच राज्यभरातील दौऱ्यांचे नियोजन, माध्यमांशी समन्वय आणि विविध संघटनात्मक उपक्रमांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल कविटकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटना, जनसंपर्क, माध्यम समन्वय आणि विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. २०२३-२०२६ या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीडियात १२ वर्षे बातमीदार ते ब्युरो चिफ या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्ष संघटनेला निश्चितच होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. याबाबत अमोल कविटकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या जबाबदारीसाठी माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. ही नियुक्ती माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. नेतृत्वाने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, माध्यम समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाने दिलेल्या या संधीबद्दल सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या दौरा समन्वयकपदी अमोल कविटकर:माध्यम विभागाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी निवड
