![]()
सेनगाव पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून बदली झाल्यानंतरही स्वच्छतागृहाच्या बांधकामाी संचिका वारंवार मागणी करूनही सादर न करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर सेनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १६ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव नगर पंचायतीमध्ये गणेश गांजरे हे ता. २१ ऑगस्ट २०२४ ते ता. २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होते. शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत सेनगाव येथील आठवडी बाजारात स्वच्छतागृह मंजूर करण्यात आले होते. सुमारे २६ लाख रुपये खर्चाच्या या स्वच्छतागृहाच्या बांधकामाला २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मान्यता देऊन तनुजा कंन्स्ट्रक्शन कंपनीला बांधकामाचे कंत्राटही देण्यात आले होते. सेनगावच्या आठवडी बाजारात महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारणीमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गावकऱ्यांची गैरसोय दुर होणार होती. सदर काम फेब्रुवारी २०२५ पासून सहा महिन्यात पूर्ण करणे अपेक्षी होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी गाजरे यांची परभणी महानगर पालिकेमध्ये बदली झाली. या बदलीनंतरही त्यांनी स्वच्छतागृह बांधकामाची संचिका कार्यालयात दिलीच नाही. दरम्यान, सध्या कार्यरत असलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा परिविक्षाधिन मुख्याधिकारी योगेशकुमार मीना यांनी या संदर्भात तपासणी केली. यामध्ये संचिका न दिल्यामुळे सदरील काम मुदतीत पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात वारंवार मागणी करूनही संचिका न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगेशकुमार मीना यांनी दिले होते. त्यासाठी प्रशाकिय अधिकारी दीपीका राऊत यांना प्राधिकृत करण्यात आले. त्यानुसार प्रशासकिय अधिकारी दीपीका राऊत यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून सेनगाव पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकारी गणेश गाजरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
कडक कारवाई:बदलीनंतरही स्वच्छतागृहाच्या बांधकामाची संचिका न देणाऱ्या सेनगावच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
