![]()
वाशिम जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या परीक्षा केंद्रावर सोमवारी झालेल्या फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्राच्या परीक्षेला उपस्थित सर्वच्या सर्व 581 विद्यार्थ्यांनी एकसारखीच उत्तरे लिहिल्याची बाब निदर्शनास आली आहेत. सामूहिक कॉपीच्या या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी फिजिक्सचा पेपर होता. त्यात भरारी पथकाने वाशिम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (क्रमांक 0906), टो – जुमडाफाटा येथे धाड टाकली. त्यात परीक्षा सुरू असताना केंद्रावर सामूहिक कॉपी सुरू असल्याची बाब भरारी पथकाच्या निदर्शनास आली. यासंबंधीच्या माहितीनुसार, भरारी पथकाने 16 फेब्रुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास या परीक्षा केंद्राला भेट दिली. केंद्रावर केऊण 584 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 581 विद्यार्थी परीक्षेला प्रत्यक्ष हजर होते. पथकाने त्यांच्या उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी केली, तव्हा अधिकारीही चक्रावून गेले. परीक्षेला उपस्थित असणाऱ्या सर्व 581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः एकसारखीच होती. जणूकाही सर्व विद्यार्थ्यांनी एकाच स्त्रोतातून उत्तरपत्रिका कॉपी केली होती. काही उत्तरपत्रिकांवर तर वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पेन व पेन्सिलने विशिष्ट खुणाही केल्याच्या आढळल्या आहेत. परीक्षा केंद्रावर सुविधांचाही अभाव भरारी पथकाच्या कारवाईत या परीक्षा केंद्रावरील विदारक स्थितीही समोर आली आहे. या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना अत्यंत दाटीवाटीने बसण्याची व्यवस्था आहे. याशिवाय त्यांच्या बसण्याची व्यवस्था टिनशेडमध्ये करण्यात आली आहे. अपुरी प्रकाशयोजना, पंखे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, तसेच वीज खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याचेही स्पष्ट केले. या केंद्रावर केवळ 8 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनीही या परीक्षा केंद्राला भेट दिली होती. भरारी पथकाच्या तपासात एक कर्मचारी मोबाईल फोन घेऊ परीक्षा केंद्रात फिरत असल्याचे निदर्शनास आले. मोबाईल तपासणीस टाळाटाळ केल्यानंतर अखेर 2 मोबाईल ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. शिक्षण विभाग उगारणार कारवाईचा बडगा बैठे पथकातील सदस्यांनीही आपल्या अहवालात उपस्थित 581 विद्यार्थ्यांनी सामुदायिक कॉपी केली आहे, असे नमूद केले आहे. भरारी पथकाचा अहवाल, उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि संबंधित कर्मचाऱ्याकडे आढळलेले मोबाईल यावरून केंद्र क्रमांक 0906 येथे सामुदायिक कॉपी झाल्याचे स्पष्ट होत असून, या प्रकरणी शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन व गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
बारावी फिजिक्सच्या पेपरला 'मास कॉपी':परीक्षा देणाऱ्या सर्व 581 विद्यार्थ्यांची उत्तरे एकसारखी; वाशिम जिल्ह्यातील केंद्रावरील प्रकार
