Triveni Sangam of singing, playing and dancing at Sawai Mahotsav | सवाई महोत्सवात गायन, वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम: डॉ. भरत बलवल्ली, कला रामनाथ, जयंती कुमरेश, मेघरंजनी मेधी यांचा अविष्कार – Pune News

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या सत्रात शनिवारी कंठसंगीत, वाद्यवादन आणि नृत्याचा त्रिविध कला संगम रसिकांनी अनुभवला. ‘गीतं वाद्यं तथा नृत्यं, त्रयं संगीतमुच्यते’ या उक्तीचा प्रत्यय या त्रिवेणी संगमाने रसिकांना आला.

.

सत्राचा उत्तरार्ध प्रसिद्ध गायक डॉ. भरत बलवल्ली यांच्या गायनाने सुरू झाला. ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतलेल्या बलवल्ली यांनी राग शहाणा कानडा सादर केला. त्यांनी ‘मोरे आये कुवर कन्हाई…’ ही झपतालातील रचना सविस्तर मांडली, तर ‘मंदिरवा मै मोरे आज…’ हा द्रुत एकताल ऐकवताना उत्तम दमसास आणि तयारीच्या तानांचे दर्शन घडवले. त्यानंतर राग शंकरामधील स्वरराज छोटा गंधर्व यांची ‘प्रथम नाद पहचानो…’ ही त्रितालातील रचना पेश केली. संगीत मानापमान नाटकातील ‘युवतिमना दारुण रण रुचिर प्रेमसे…’ हे हंसध्वनी रागातील नाट्यगीत त्यांनी आक्रमकपणे सादर केले आणि ‘हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा…’ या भक्तीरसपूर्ण रचनेने गायनाचा समारोप केला. त्यांना रामकृष्ण करंबेळकर (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), गंभीर महाराज (पखवाज), दिगंबर जाधव आणि मुबिन मिरजकर यांनी साथ केली.

रात्रीसोबत सवाईचा उत्तरार्ध अधिक रंगतदार करणारा व्हायोलिन आणि सरस्वती वीणा वादनाचा स्वराविष्कार रसिकांना स्वर समृद्ध करणारा ठरला. विदुषी कला रामनाथ यांचे व्हायोलिन आणि डॉ. जयंती कुमरेश यांचे सरस्वती वीणावादन, असा दुहेरी स्वरयोग राग चारुकेशीच्या माध्यमातून साधला गेला. आलाप, जोड, झाला यातून चारुकेशी रंगतदार झाला. व्हायोलिन आणि सरस्वती वीणा यांच्यासोबत ज्येष्ठ तबलावादक पं. योगेश समसी आणि जयचंद्र राव (पखवाज) यांचे सवालजवाब श्रोत्यांना आनंद देणारे ठरले. कबीर शिरपूरकर व सावनी जोशी यांनी तानपुरा साथ केली.

आसाम येथील प्रसिद्ध कथक नृत्यांगना मेघरंजनी मेधी यांचे कथक नृत्य अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले. मेघरंजनी यांनी देवीस्तुतीने आपल्या नृत्याचा प्रारंभ केला. देवीची सौम्य, उग्र, दैत्यनाशिनी, असुरसंहारिणी, युद्धसन्मुख अशी विविध रूपे तसेच देवीचे मंगल, शांत असेही रूप त्यांनी पदन्यास आणि अभिनयातून साकारले. त्यानंतर कथकच्या लखनौ घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे थाट, आमद, परण, टुकडे, चक्रधार व चक्कर त्यांनी विलंबित, मध्य आणि द्रुत लयीत सादर केले. कथक नृत्यातील भावपक्ष अधोरेखित करणारी कृष्णलीलाही त्यांनी साकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *