प्रत्येक प्रभागात भाजप पक्षाकडून इच्छुकांची सध्या तरी भाऊ गर्दी असल्याचे पहावयास मिळत आहे , एका जागेसाठी अनेक दावेदार पुढे येऊन पक्षांतर्गत ताणतणाव वाढून बंड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अर्धापूर नगरपंचायत मध्ये अद्याप नव्याने प्रभाग रचना झाली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी प्रभागनिहाय समीकरणे तपासली जात असून, एकाच प्रभागात अनेक इच्छुकांमुळे अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी नाराजीचे सूर, तर काही ठिकाणी बंडखोरीची कुजबुज ऐकू येत आहे. त्यामुळे निष्ठावंताना उमेदवारी मिळते कि पक्षात नव्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रत्येक परिसरात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यावेळी प्रभाग खेचून आणायचाच असा निर्धार व्यक्त केला जात आहे. यामुळे स्थानिक वरिष्ठ नेत्यांची धावपळ वाढली असून, योग्य उमेदवार शोधताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. एकूणच, अर्धापूर नगर पंचायत निवडणूकिला अजून काही महिने बाकी असताना अर्धापूर शहरात राजकीय रणशिंग फुंकले जात असून, बाशिंग बांधलेल्या इच्छुकांमुळे येत्या काळात शहराचे राजकीय वातावरण अधिकच तापणार, हे निश्चित आहे.
तिकीट नाकारल्यास दुसऱ्या पक्षांमध्ये वर्णी लावण्याचीही तयारी
भाजप, काँग्रेस,राष्ट्रवादी या प्रभावशील पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक आतापासून आपापल्यापरीने फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे कळत आहे , तर पक्षाने तिकीट नाकारल्यास दुसऱ्या पक्षांमध्ये वर्णी लावण्याचा प्रयत्न इच्छुकांद्वारे सुरू आहे असे दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरु आहे. यामध्ये कोण कोणाला शह-काटशह देणार हे येणारा काळच ठरवेल.
कोणत्याही निवडणुका म्हटल्या की पैसा, दारू, मटण, जेवणावळ्या हा पॅटर्न आता नित्याचा बनला आहे. त्यामुळे नेत्यांनादेखील माहिती झाले आहे की पाच वर्षे विकासकामे करण्यापेक्षा निवडणुकीत या सगळ्या गोष्टी केल्या की सगळं कसं ओके होते. त्यामुळे पैशाच्या जिवावर निवडणुका जिंकणार्यांना गावच्या विकासाचं काय पडलंय, त्यामुळे अशी मंडळी गावचा सामाजिक विकास काय साधणार ? अशी चर्चा शहरातील नागरिक दबक्या आवाजात करत आहेत.
मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे, यासाठी काम केले जात असून अर्धापूरकरांचे जीवन त्रस्त करण्याचे काम स्थानिक नगरसेवक व मुख्याधिकारी करत आहेत का असा प्रश्न अर्धापूरकरांना पडला असून याकडे वरिष्ठ नेत्यांनी आगामी होणाऱ्या नगर पंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लक्ष देण्याची गरज आहे असे अर्धापूर शहरवासीयांना वाटते.
मुख्याधिकारी व नगरसेवक मस्त, अर्धापूरवाशीय मात्र त्रस्त.असे चित्र सध्या शहरात पाहव्यास मिळत आहे.
अर्धापूर नगरपंचायतीला करोडोचा विकास निधी मिळाला आहे. मात्र अर्धापूर नगरीची दुरावस्था पाहवयास मिळते गावातील रस्ते विकास कामाच्या नावाखाली फोडून ठेवून तसेच ठेवले आहेत तर नाल्याची दुरावस्था झाली आहे. विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे सध्या अर्धापूर शहरात सुरू आहेत, ठिकठिकाणी खड़े पाहावयास मिळतात. पिण्यास स्वच्छ पाणी येत नाही अशा अनेक समस्या अर्धापूर नगरीत पहावयास मिळते. मग करोडो निधीतून अर्धापूर शहरापेक्षा नगरपंचायत मधील पदाधिकारी व अधिकारी यांचा तर जास्त विकास होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.
अशाप्रकारे बोगस आणि निकृष्ट बांधकाम करण्यात येत असून अधिक मलिंदा लाटण्याच्या नादात विकासाच्या नावाखाली बोगस कामे करण्यात येत आहेत. या कामाची चौकशी केल्यास सर्वांचे पितळ उघडे पडणार आहे. मात्र त्यांना देखील पदाधिकारी आणि अधिकारी यांची साथ असल्याने याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर पंचायतच्या अभियंत्यांची कामावर देखरेख असायला हवी होती, मात्र त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही तांत्रीक बाबीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येत आहे. बहुतांश विकास कामे नगरसेवकांचे कार्यकर्तेच वा स्वतः नगरसेवकच दुसऱ्याच्या नावावर करीत असल्याने राजकीय ताकदीच्या बळावर कामांची लाखो रुपयांची बिले काढण्याची किमया त्यांना अवलिया अवगत आहे असे दबक्या आवाजात नागरिकांतून बोलल्या जात आहे. याचा परिणाम आगामी नगरपंचायत निवडणुकीत किती होणार हे येणारा काळच ठरवेल.
इच्छुक कार्यकत्यांची एकमेकांकडे रात्री उशीरपर्यंत उठ-बस सुरू झाल्याने बिबट्याचा आवाज गुल झाल आहे. यामुळे शहरातील जनतेचे लक्ष आता राजकारणातील या बिबट्याकडे कडे लागले असून कोण कोणाची शिकार करणार हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.
