श्रीनगरमध्ये ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न गंभीर; व्यापारी, विद्यार्थी त्रस्त!

नगरपालिकेची गाडी येते, थोडेफार काम होते; मात्र काही दिवसांत परिस्थिती पुन्हा जैसे थे

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात रोहित बार आणि मोगडपल्ली मेडिकल सेंटरच्या मधून कोचिंग क्लासेसकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने परिसरातील व्यापारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, व्यावसायिकांना व्यवसाय करणेही कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या गल्लीमधून दररोज अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी कोचिंग क्लासेससाठी ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने तसेच साचून राहत असल्याने त्यांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे पादचारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः या भागातील व्यापाऱ्यांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तात्पुरती स्वच्छता, पुन्हा परिस्थिती जैसे थे!

संबंधित समस्येबाबत परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावाही केला आहे. महानगरपालिकेचे स्वच्छता पथक किंवा वाहन या ठिकाणी येऊन काही प्रमाणात काम करते. मात्र, दोन-चार दिवसांत पुन्हा ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात होते. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

या परिसरातील व्यापारी पवन लोहगावकर यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम आहे. यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा केला; मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, व्यवसाय करणेही कठीण झाले आहे.

महानगरपालिका प्रशासन, संबंधित नगरसेवक, महापौर आणि उपमहापौर यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी आणि वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी व्यापारी पवन लोहगावकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *