![]()
“आम्ही मंत्री पदाला लाथ मारून बाहेर पडलो आहोत. शंभर दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगू. त्यामुळे आम्हाला दादागिरीची भाषा शिकवू नका, तो आमचा जुना ‘धंदा’ आहे. आम्ही असेच आमदार झालो नाहीत. आम्हाला ३०२, ३०७ चांगलीच माहिती आहेत. ज्याच्यावर
.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. 2023 मध्ये कार्यकाळ संपलेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत. त्यामुळे येथील महानगरपालिका निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. 2003 मध्ये या महानगरपालिकेत गेल्या 20 वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्वच पक्षांचे महापौर झाले आहेत. दोन वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी आयोजित सभेत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पाणीपुरवठा योजनेवरून राष्ट्रवादीला खुले आव्हान
अहिल्यानगरच्या पाणीपुरवठा योजनेवरून गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “माझे राष्ट्रवादीवाल्यांना चॅलेंज आहे, नगरची पाणीपुरवठा योजना या पठ्ठ्याने मंजूर केली आहे. ‘पोरं तुम्ही पैदा करायची आणि बारसं आम्ही करायचं’, हा धंदा आता चालणार नाही.” अहिल्यानगर हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असून दिवंगत अनिल भैय्या राठोड येथून पाच वेळा निवडून आले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
पोलिसांनाही सुनावले खडे बोल
अहिल्यानगर शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांच्या भूमिकेवर बोट ठेवताना पाटील यांनी पोलिसांनाही दम भरला. “अहिल्यानगरचे पोलीस पिस्तूल घेऊन दादागिरी करतात. पण आम्हाला दाबायचा प्रयत्न करू नका. आम्ही रबरी चेंडूसारखे आहोत, जेवढे दाबाल तेवढी उंच उडी घेऊ. माझ्यावर चोरी, दरोडा किंवा बलात्काराच्या नाही, तर आंदोलनाच्या ३५ केसेस आहेत. ‘आय लव्ह यू’ केसेस आहेत त्या,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
आमच्या मित्रानेच ‘लव्ह मॅरेज’ तोडले
महाविकास आघाडी आणि बंडाचा संदर्भ देताना पाटील म्हणाले, “आमच्याच मित्राने आमच्याशी झालेले ‘लव्ह मॅरेज’ तोडले. आमच्याशी युती करताना शेवटपर्यंत ‘पप्पी घे, पप्पी घे’ केले आणि नंतर आम्हाला सोडून दिले. काल कोणीतरी ५० खोक्यांवरून बडबडले, पण जर आम्ही उठाव केला नसता तर तुमची आणि राज्याची स्थिती काय झाली असती? एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांना दाढी आहे, त्यामुळे शिंदे आले नाहीत तरी त्यांचा पठ्ठा नगरकरांना जागे करायला आला आहे.”
सोन्याचा चमचा घेणाऱ्यांना दीड हजार काय कळणार?
‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना पाटील म्हणाले, “ज्यांचा जन्मच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झाला आहे, त्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? आम्ही जात न पाहता राज्यातील प्रत्येक गरजू महिलेला हक्काचे पैसे दिले आहेत.”
शायरीतून विरोधकांवर निशाणा
भाषणाच्या शेवटी गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत शायरी म्हणत विरोधकांना आणि एमआयएमसोबतच्या युतीला टोला लगावला. “आंखे होकर बने अंधे तो बिजली क्या जाने, जिस अंधे को चिराग न मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लढना ना मालूम वो तीर-तलवार क्या जाने!” शिवसेना ही विचारांवर चालणारी संघटना असून पक्ष संपवण्याच्या वल्गना करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
