मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सर्वपक्षीय इच्छाशक्ती आवश्यक:हाजी जुबेर मेमन यांचे पुण्यात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारात प्रतिपादन




पुण्यात महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सतर्फे नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांवर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या भव्य सत्कार समारंभास राज्यभरातील मोठ्या संख्येने नवनिर्वाचित नगरसेवक आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, संभाजीनगर, संगमनेर, अहिल्यानगर, मुंबई, सातारा, कोल्हापूर यासह विविध भागांतील नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हाजी मेमन यांनी यावेळी सांगितले की, आज विविध समाजघटक आपल्या प्रश्नांसाठी संघटित होत आहेत. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजानेही पक्षभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येणे गरजेचे आहे. युवक आणि महिलांनी राजकारण व समाजकारणात सक्रिय सहभाग घेतल्यास समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या समारंभात मुस्लिम समाजामध्ये मराठी भाषेचे ज्ञान वाढावे या उद्देशाने ‘चला मराठी शिकूया’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या. भाषिक सक्षमता ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असल्याचे याप्रसंगी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला हाजी जुबेर मेमन यांच्यासह महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे पुणे शहर अध्यक्ष फरीद खान, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इलहाजोद्दीन फारुखी, आदिल पब्लिकेशनचे कामिल शेख, कलाकार आसिफ अलबेला (मालेगाव), कारी मुद्दसिर, सुलतान शहा, तारीख जमील, एकबाल अन्सारी, मजहर शेख, अक्रम मदारी आणि राज्यातील विविध पक्ष संघटनांचे नवनिर्वाचित नगरसेवक, महिला, युवक तसेच महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *