अजित पवारांच्या अपघाताचा नवा VIDEO:अगोदर विमान कोसळले नंतर स्फोट झाला; स्फोटानंतर घाबरून गावकरी घटनास्थळाहून पळाले




दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात विमान जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याचे व नंतर अचानक मोठा स्फोट होताना दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे अजित पवारांच्या अपघाताविषी पुन्हा एका शंकाकुशंकांचे वादळ उठण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी बारामती येथील एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. ते त्या दिवशी बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी येत होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अचानक धावपट्टी शेजारच्या खड्ड्यात कोसळले. त्यात अजित पवारांसह 5 जणांचा जागीच कोळसा झाला. या दुर्घटनेविषयी आता वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांसह इतर काही नेत्यांनी हा घातपात असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी ही केवळ दुर्घटना असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. काय आहे नव्या व्हिडिओत? अजित पवारांचे विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.45 वा. बारामती विमानतळालगत असणाऱ्या गोजुबावी गावालगत कोसळले. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते तिथे पोहोचले तेव्हा विमान जळत होते. त्यामुळे कुणालाच विमानाजवळ जाता येत नव्हते. त्यांनी त्या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ते तिथे एकमेकांशी संवाद साधत असतानाच अचानक विमानात एक जोरदार स्फोट झाला. त्यामुळे घाबरून सर्व गावकरी दूर पळून गेले. हा स्फोट एवढा जोरदार होता की, विमानाचे भाग इतरत्र फेकल्या गेले. हा सर्व प्रकार गावकऱ्यांनी शूट केलेल्या व्हिडिओत कैद झाला आहे. या घटनेनंतर काही वेळाने पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विमानाची आग विझवून मृतदेह ताब्यात घेतले. रोहित पवारांना घातपाताचा संशय

उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई व दिल्लीत दोन पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद असण्यावरही संशय व्यक्त केला आहे. प्रस्तुत प्रकरणात क्रिमिनल इनव्हेस्टीगेशनची गरज आहे. त्यात भारतीय तपास यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्य सरकारने या प्रकरणी सीआयडी चौकशीची घोषणा केली आहे. याशिवाय या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडूनही तपास करण्याची गरज आहे. या सर्वांनी संयुक्तपणे पारदर्शक तपास केला तरच यासंबंधी खऱ्या गोष्टी समोर येतील. या प्रकरणी विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद असल्याने आम्हाला तपास करता येत नाही, असे कारण दिले गेले तर मी म्हणतोय त्यावर शिक्कामोर्तब होईल. दादांचा अपघात नव्हता तर घातपातच होता हे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरांनीही व्यक्त केला संशय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे अफवा पसरवणे नसल्याचे ठामपणे म्हटले आहे. प्रस्तुत अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? टेकऑफ अगोदर प्रवाशी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. खाली पाहा घटनेचा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *