हिंगोलीत असहाय्यतेचा गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार:लग्न अन् प्लॉटचे दाखवले आमिष; 2 महिन्यांत दोनदा अत्याचार, आरोपी फरार




सेनगाव तालुक्यातील एका गावात महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्या महिलेच्या तक्रारीवरून एका व्यक्ती विरुद्ध शुक्रवारी ता. 13 एका व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यात एका गावामध्ये एक महिला एकटी राहाते. त्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत बाबू राठोड या व्यक्तीने त्या महिलेशी जवळीक वाढवली. त्यानंतर तिला प्लॉट घेऊन तुझ्या नावावर करतो तसेच त्यावर घर बांधून देतो असे आमिष दाखविले. त्यानंतरही त्या महिलेने त्यास दाद दिली नाही. मात्र तुझ्या सोबत लग्न करून तुझा सर्व खर्च करतो असे म्हणत त्याने महिलेला विश्‍वासात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही त्या महिलेने त्याला दाद दिलीच नाही. दरम्यान, सदर महिला ऐकत नसल्याचे लक्षात येताच बाबु याने दोन महिन्यापूर्वी महिला घरात एकटी असतांना तिच्या घरात जाऊन तिच्यावर अत्याचार केला. मात्र बदनामीच्या भितीने महिलेने कोणालाही हा प्रकार सांगितला नाही. मात्र महिलेने या प्रकाराची वाच्यता केली नसल्याचे पाहून बाबु याने पुन्हा एकदा तिच्या घरात जाऊन अत्याचार केला तसेच शिवीगाळ केली. या प्रकरणात त्या महिलेने थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बाबु राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, जमादार थेट, सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात बाबु राठोड याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks