12 व्या गानसरस्वती महोत्सवाला दिमाखदार सुरुवात:किशोरी आमोणकर यांना गायन-वादनातून आदरांजली, नव्या पिढीचे सादरीकरण




पुणे येथे १२ व्या गानसरस्वती महोत्सवाला शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) दिमाखदार सुरुवात झाली. भारतीय शास्त्रीय संगीतातील गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात युवा गायिका तेजश्री आमोणकर, सतारवादक भूपाल पणशीकर आणि गायक भुवनेश कोमकली यांनी आश्वासक सादरीकरण केले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा महोत्सव राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. महोत्सवाच्या सुरुवातीला वेदमूर्ती वरदेंद्र श्रीपाद जोशी आणि वेदमूर्ती जयदीप प्रसाद जोशी यांनी वेदमंत्रपठण करून आशीर्वचन दिले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त पं. रघुनंदन पणशीकर आणि अपर्णा पणशीकर यांनी वेदमूर्तींचा सन्मान केला. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून नाट्यसंपदा प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका तेजश्री आमोणकर यांच्या गायनाने झाली. त्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या नात आणि शिष्या आहेत. त्यांनी जयपूर घराण्याचा राग ललितागौरी विलंबित तीनतालात ‘प्रीतम सैय्या…’ या बंदिशीसह सादर केला. त्यानंतर राग कामोदमध्ये मध्यलय एकतालात ‘लागी रे मोरी नई लगन…’ ही रचना ऐकवली. तेजश्री यांना यती भागवत (तबला), ज्ञानेश्वर सोनवणे (संवादिनी), तसेच वनिता तांबोसकर आणि अभिषेक तांबिरे यांनी तानपुऱ्यावर साथ केली. आपल्या आजीच्या नावाच्या व्यासपीठावर प्रथमच गायन करत असल्याची भावना तेजश्री आमोणकर यांनी व्यक्त केली. पं. रघुनंदन पणशीकर यांनी यावर बोलताना सांगितले की, हे व्यासपीठ गुरू किशोरीताईंचे आहे आणि आज त्यांची नात तेजश्रीचे गायन याच व्यासपीठावर सादर होणे, हा आनंदाचा भाग आहे. यानंतर पं. दिनकर पणशीकर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक भूपाल पणशीकर यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग पूरिया आलाप, जोड आणि झाला या क्रमाने सादर करत राग विस्तार केला. त्यानंतर मिश्र खमाजमधील दादरा तालातील धून त्यांनी वाजवली. त्यांना तबल्यावर पं. रामदास पळसुले यांनी साथ केली, तर अमृता चौधरी यांनी तानपुऱ्यावर साथ दिली. पंडित कुमार गंधर्व यांचे नातू व पं. मुकुल शिवपुत्र यांचे सुपुत्र असलेले प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांनी राग केदार पेश केला. घराणेदार गायकीची तालीम, रियाजी आवाज आणि प्रतिभासंपन्न आशयाने युक्त असे भुवनेश यांचे गायन होते. त्यांना आशय कुलकर्णी (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच ओंकार अलम आणि गणेश यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *