अजितदादांच्या निधनानंतर अशा लिखाणाचा हेतू काय?:शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप, विलीनीकरणावरही मांडली भूमिका




दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरून राजकारण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा विचार समोर आला, तर त्यावर पक्षपातळीवर चर्चा होईल. मात्र, आम्ही एनडीएचा घटक पक्ष असल्याने कोणताही मोठा निर्णय घेताना भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य आहे,” असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या भूमिकेबाबत केलेल्या दाव्याचाही त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विलीनीकरणाच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “जेव्हा एखादी चर्चा सुरू होईल, तेव्हा सुनेत्रा पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर विचार करतील. मात्र, आज एनडीएचा मुख्य पक्ष भाजप आहे. आम्ही २०२३ मध्ये जेव्हा एनडीएत सहभागी झालो, तेव्हा भाजपने आम्हाला अनुमती दिली होती. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारच्या मोठ्या निर्णयावेळी आघाडीतील मुख्य पक्षाशी चर्चा करावीच लागेल.” शशिकांत शिंदेंच्या दाव्यावर आक्षेप शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात दावा केला होता की, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटे नाटे षडयंत्र करून केलेले आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रीवादीतून बाहेर पडून, वेगळा गट स्थापन करावा लागला होता. याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. पण झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची, अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. यावर संताप व्यक्त करत सुनील तटकरे म्हणाले, “शिंदेंनी केलेले विधान अत्यंत गैर आहे. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अनाठायी आहे. दादांनी घेतलेले निर्णय हे स्वच्छ मनाने आणि पक्षाच्या हितासाठीच होते. आता असे लिहून ते नेमके काय साध्य करू पाहत आहेत? त्यांचा हेतू काय? हे मला कळू शकले नाही.” यापुढे जर काय ते अशा आरोपांमुळे दादांनी हा निर्णय घेतला असं जर काही बोलत राहतील, तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल, असा गर्भित इशारा सुनील तटरकेंनी शशिकांत शिंदे यांना दिला. अजितदादांची भाजपबाबतची भूमिका स्पष्ट होती “भाजपसोबत जाण्याची अजितदादांची भूमिका नवीन नव्हती,” असा पुनरुच्चार तटकरे यांनी केला. २०१४, २०१६ आणि २०१७ मध्येही चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. २०१९ मध्येही दादांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार राज्याला स्थिरता देऊ शकते. त्यांनी आपली ही इच्छा कधीही लपवून ठेवली नव्हती, असेही सुनील तटकरे यांनी नमूद केले. तटकरेंनी लेखाच्या टायमिंगबद्दल बोलणे टाळले दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा १२ फेब्रुवारी रोजी होणार होती, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. घोषणेच्या तारखेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज १३ फेब्रुवारी रोजी शशिकांत शिंदेंचा लेख समोर आला आहे. यावर सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मासिक दर महिन्याला प्रकाशित होत असते. हे मासिक पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होत असते. आता ती तारीख योगायोग म्हणून आहे की, मुद्दामहून १२ तारखेनंतर १३ तारखेला लिहायचे? याबद्दल मला बोलायचे नाही. माझे त्याबद्दल काही मत नाहीये. या लेखाचं शीर्षक आहे की ‘भावपूर्ण निरोप अजित दादांना’ याचा अर्थ दादांच्या अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे. दादांबद्दल जे लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे, असे सुनील तटकरेंनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *