![]()
जनतेच्या वेळोवेळी उद्भवणाऱ्या अडचणी व समस्यांचे तात्काळ निराकरण करता यावे, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी निवडक विभागप्रमुखांचा समावेश असलेली ‘वॉर रूम’ गठित केली आहे. या वॉर रूमची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी मेळघाटातील विविध प्रश्न आणि त्यांच्यावरील उपाययोजना केंद्रस्थानी होत्या. महसूल भवन येथे जिल्हाधिकारी येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. विभावरी दाणी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, महिला व बालविकास विभागाचे विलास मरसाळे, मेळघाटातील ‘महान’ संस्थेचे डॉ. आशिष सातव, चिखलदरा येथील शिवस्फुर्ती प्रोसेसिंग क्लस्टर या संस्थेचे सुनील भालेराव यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. मेळघाट परिक्रमा उपक्रमांतर्गत माहिती, शिक्षण आणि संप्रेषण अभियान राबवण्यासाठी शिवाजी सायन्स कॉलेज सहभाग घेणार आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थी मेळघाटात कोरकू भाषेतून पथनाट्ये सादर करतील, तसेच कोरकू बांधवांना समजेल अशा भाषेत संवादसत्र आयोजित करतील. या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती निर्माण केली जाईल. याशिवाय, मेळघाटात प्रामुख्याने उत्पादित होणाऱ्या कुटकी आणि सावा या मिलेट्स फूड्सबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबवला जाईल. मिलेट्स फूडच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले. हॉटेल्स आणि दैनंदिन जीवनात मशरूम खाद्यान्नांचा वापर वाढल्याने, मशरूमची वाढती मागणी लक्षात घेऊन मशरूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांना दिले. प्राथमिक कृषी सहकारी संस्था (PACS) या ग्रामीण स्तरावरील तळागाळातील सहकारी पतपुरवठा संस्था आहेत. या संस्था थेट शेतकऱ्यांशी निगडित असून खते, बियाणे, कीटकनाशके पुरवणे, अल्प मुदतीचे कर्ज देणे, शेतमाल साठवणूक आणि विक्री यांसारख्या बहुउद्देशीय सेवा पुरवतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या या संस्थांच्या माध्यमातून दोन-तीन गावातील महिलांना एकत्रित करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विशेष उपक्रम राबवून त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना यावेळी देण्यात आले. या बैठकीत मेळघाट क्षेत्रातील विद्युत पुरवठ्याचाही आढावा घेण्यात आला. येथील विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली वॉर रूमची बैठक:मेळघाटातील समस्यांवर लक्ष केंद्रित, उपाययोजनांवर चर्चा
