![]()
अंजनगाव सुर्जी येथे महसूल विभागाने वाळू तस्करीविरोधात कारवाईचा प्रयत्न केला असता, वाळूने भरलेल्या डंपर चालकाने महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून पळ काढला. गुरुवारी पहाटे ही घटना घडली. पाठलागादरम्यान चालकाने सुमारे १० ब्रास वाळू रस्त्यावरच सांडवली. परतवाडा मार्गावरून अंजनगावकडे येणाऱ्या डंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात पळ काढला. महसूल विभागाच्या पथकाने तातडीने पाठलाग सुरू केला. चालकाने चालत्या वाहनाचे मागील फाटक उघडून रस्त्यावर वाळू सांडवत अकोट रोडने पलायन केले. यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ग्राम महसूल अधिकारी योगेश लंगडे (विहीगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ५.३० वाजता उस्सव नाक्याजवळ पथक तैनात असताना संशयित डंपर दिसला. वाहन थांबवण्याचा इशारा देऊनही चालकाने दुर्लक्ष केले. गौमाता दूध डेअरी परिसरात ट्रक थांबवून वाळू वाहतुकीचा पास मागितला असता, चालकाकडे कोणतीही वैध परवानगी नव्हती. वाहन तहसील कार्यालयात लावण्यास सांगितल्यावर चालकाने अधिकारी लंगडे यांना धक्काबुक्की केली आणि वाहन पळवून नेले. पाठलागादरम्यान चालकाने मोठ्या प्रमाणात वाळू सांडवल्यामुळे शहानूर पुलापासून तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंत रस्त्यावर वाळूचा थर पसरला होता. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने सांडलेली वाळू गोळा करून ती तहसीलदारांच्या तोंडी आदेशानुसार निवासस्थानासमोर ठेवण्यात आली. या घटनेनंतर अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, ट्रकच्या नंबर प्लेटवर तेल लावल्यामुळे क्रमांक स्पष्ट दिसू शकला नाही. या घटनेदरम्यान ट्रकसोबत एमएच २७, डीइ ५७८५ क्रमांकाची स्विफ्ट कार होती, तिचा चालक अविनाश जाधव असल्याचे समोर आले आहे. ट्रक आणि कारचे मालक प्रज्वल माथनकर आणि यश राजगुरे (रा. मोर्शी) असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अंजनगाव सुर्जीत वाळू तस्करांनी रस्त्यावर सांडवली वाळू:महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत डंपर पळवला
