![]()
जिल्हा परिषदेचे नांदगाव खंडेश्वर येथील पाणी परीक्षण व गुणवत्ता तपासणी केंद्र इतरत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या हालचालींना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, हा तालुक्यावर अन्याय असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी हे केंद्र हलवण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू आणि तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आगाऊ तक्रारही दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत असलेले हे केंद्र पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर परिसरात आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या केंद्राला पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. केंद्रासाठीची जागा अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी देण्यात आल्याने आता जागा अपुरी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. पूर्वी हे कार्यालय अमरावती जिल्हा परिषदेत होते. अमरावती आणि नांदगाव खंडेश्वरमधील सुमारे ३५ किलोमीटरच्या अंतरामुळे तालुक्यातील नागरिकांना पाणी परीक्षणासाठी मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांनी व तत्कालीन लोकप्रतिनिधींनी अनेक निवेदने व आंदोलने करून हे केंद्र नांदगाव खंडेश्वर येथे मंजूर करून आणले होते. सध्या या केंद्राचा लाभ तालुक्यातील १६१ खेडे-गावे आणि ५८ ग्रामपंचायतींना होत आहे. या केंद्रामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुका आधीच विकासाच्या बाबतीत मागासलेला असल्याने, हे महत्त्वाचे केंद्र इतर तालुक्यात हलवणे म्हणजे विकासावर आणखी एक घाला असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून पाणी परीक्षण व गुणवत्ता तपासणी केंद्र नांदगाव खंडेश्वर येथेच सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश अमरावती जिल्हा परिषदेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
नांदगाव खंडेश्वर पाणी परीक्षण केंद्र स्थलांतरणाला विरोध:तालुक्यावर अन्याय; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तीव्र आंदोलनाचा इशारा
