अजितदादांच्या निधनानंतर प्रचारात रस नाही:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीवर मत




केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्याला प्रचारात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “निवडणुका येतात आणि जातात, पण दादा गेल्याचे दुःख आमच्या मनात आहे,” असे मोहोळ म्हणाले. पुणे जिल्ह्याचे भाजप पक्षाचे प्रभारी असूनही आपण जिल्हा परिषद प्रचाराला कुठेही गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार जिल्ह्यात ३५ ते ४० सभा घेणार होते, मात्र दुर्दैवी घटनेनंतर परिस्थिती बदलली आहे. “राजकारण करायला आयुष्य आहे, अशावेळी प्रचार करणे योग्य वाटले नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार सुज्ञ असून ते योग्य निर्णय घेतील, असेही मोहोळ म्हणाले. शरद बुट्टे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर बोलताना मोहोळ म्हणाले की, ते पहाटे दिल्लीहून आले आहेत. या घटनेमागील नेमके कारण जाणून घेतल्यानंतरच आपण यावर अधिक बोलू, असे त्यांनी नमूद केले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. “हे सगळे भयानक होते,” असे सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत माहिती देताना मोहोळ यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स सापडला आहे. एआयबीची (Aircraft Accident Investigation Bureau) टीम यावर काम करत असून, डेटा डाउनलोड केला जात आहे. संपूर्ण विश्लेषणानंतर लवकरच अहवाल समोर येईल. या विषयावर कोणीही राजकारण करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मोहोळ म्हणाले की, राज्याचा आणि पुणे जिल्ह्याचा इतका मोठा नेता गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशा दुःखद प्रसंगी राजकारण करणे योग्य नाही. चौकशी होईल आणि अहवाल येतील. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असून, सीआयडी, डीजीसीआय आणि एआयबी या यंत्रणा काम करत आहेत. पुणे महापालिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून शहराला प्रतिनिधी नव्हते. आता नवीन व्यवस्था येत असून, आपली जबाबदारी वाढली आहे. पाणीपुरवठा आणि वाहतूक यांसारख्या समस्यांवर काम करून पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *