वैकुंठ मेहता संस्थेत दीक्षांत समारंभ, 93 विद्यार्थ्यांना पदवी:मुरलीधर मोहोळ यांचे पदवीधरांना सहकार चळवळीचे नेतृत्व करण्याचे आवाहन




पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा १७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील या संस्थेच्या पदव्युत्तर पदविका व्यवस्थापन – कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या २०२३-२५ च्या ३१ व्या तुकडीतील ९३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. या समारंभात ९३ विद्यार्थ्यांना कृषी व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ३१ व्या तुकडीतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि पदवी प्रदान करण्यात आली. कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. तसेच, भारतीय विद्यापीठ संघटनेने या अभ्यासक्रमाला व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी समान दर्जा दिला असून, त्याला राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाचीही मान्यता आहे. संस्थेच्या प्रभारी संचालिका आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेच्या सचिव मीनू शुक्ला पाठक यांनी मुख्य अतिथी, मान्यवर, पालक, प्राध्यापक आणि पदवीधर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सह-उपक्रमांची माहिती दिली. शिवनेरी सभागृहाचे उद्घाटन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मुरलीधर मोहोळ यांनी ३१ व्या तुकडीतील सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कठोर परिश्रम आणि शिस्तीमुळेच विद्यार्थ्यांनी हा महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचे ते म्हणाले. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेअंतर्गत या क्षेत्रात मोठ्या सुधारणा आणि प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे पदवीधर हे केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ नसून, ते भारताच्या सहकार चळवळीचे भविष्यातील नेतृत्व असणार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत विश्वासार्हता, सहकार्य, नवोन्मेष आणि जबाबदारी ही मूल्ये जपावीत, असे आवाहनही त्यांनी केले. या योगदानामुळे देशाचे सहकार क्षेत्र नवी उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे सह कार्यक्रम संचालक डॉ. डी. रवी यांनी पदक विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. किशोर मनोग्ना सुंदरी यांनी ३१ व्या तुकडीत प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांना भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या गुणवत्ता सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. कर्नाटी भानू श्री यांना भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाची गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले, तर पसुमती मोनिका सिरी यांना कांस्य पदकाने गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *