पुण्यात खडकी बाजारात दोघांवर गोळीबार:पूर्ववैमनस्यातून घटना; दोघांना अटक, पिस्तूल उगारून दहशत
![]()
पुण्यातील खडकी बाजार परिसरात पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी सुदर्शन अडसूळ (वय २५, रा. गवळवाडा, खडकी बाजार) आणि त्याचा साथीदार रचिन्मय (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, महादेववाडी, खडकी) याने खडकी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे आणि आरोपींमध्ये यापूर्वी वाद झाले होते, ज्याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी आणि त्याचे साथीदार फिर्यादीवर दबाव आणून त्याला धमकावत होते. घटनेच्या दिवशी, वाघमारे आणि त्याचा मित्र दुचाकीवरून खडकीतील राजीव गांधीनगर परिसरात आले होते. त्यावेळी आरोपी अडसूळ आणि त्याचा साथीदार चिन्मय तिथे आले. त्यांनी वाघमारे आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ केली. ‘वाघमारे आणि त्याचा मित्र हे चांदणे टोळीतील आहेत, या दोघांना गोळ्या घाला’ असे सांगून अडसूळने चिन्मयच्या कमरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. त्याने वाघमारे आणि त्याच्या मित्रावर पिस्तूल रोखले आणि गोळी झाडली, असे वाघमारेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. गोळीबारानंतर आरोपींनी पिस्तूल उगारून परिसरात दहशत माजवली आणि ‘सगळ्यांचा हिशेब चुकता करू’ अशी धमकी देऊन तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना नंतर अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
