पुण्यात बॉम्ब ठेवणारा राठोड कवठेचा:भिशीतून गावकऱ्यांनाही लाखोंचा गंडा, आई-भावासोबत राहायचा पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये
![]()
पुण्याच्या हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात ‘आयईडी’ (बॉम्बसदृष्य वस्तू) ठेवणाऱ्या संशयित आरोपीच्या पुणे पोलिसांनी शुक्रवारी नागपुरात मुसक्या आवळल्या. शिवाजी राम राठोड हा आरोपी सोलापूर जिल्ह्यातील कवठे तांडा (ता. उत्तर सोलापूर) गावचा. इथेही त्याने अनेक कारनामे केले. भिशीच्या नावाखाली कवठे तांडा परिसरातील अनेक गावकऱ्यांना 10 ते 15 लाख रुपयांचा गंडा घालून तो सात महिन्यापूर्वी तो पुण्याला पसार झाला होता, अशी माहिती ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आली. कला शाखेत पदवीधर असलेला शिवाजी राठोड हा कवठे तांडा येथे दहा बाय दहाच्या दोन खोल्यांच्या घरात राहात होता. नुकताच त्याने कर्ज काढून लॅपटॉप घेतला होता. वडील राम यांच्या मृत्यूनंतर तो कर्जबाजारी झाला. गावातही त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. पैशासाठी तगादा सुरू झाल्याने सात महिन्यापूर्वी तो लॅपटॉपसह घरातून पुण्याला निघून गेला. तिथे त्याची बहिण राहते. दरम्यान, एका हॉस्पीटलमध्ये ‘आयईडी’ ठेवल्याच्या आरोपात तो आता अडकला. तपासासाठी पुण्याचे पोलिस कवठे तांडा येथे गुरुवारी येऊन गेल्याचे तांड्यावरील गावकऱ्यांनी सांगितले. सोलापूरपासून आठ किलोमीटर अंतरावरील कवठे तांडा हे 50- 60 उंबऱ्याचे गाव. गावात ग्रामदैवत अंबाबाई मंदिरासमोरील गल्लीतून पुढे गेल्यानंतर लागणारे शेवटचे घर शिवाजीचे. दहा बाय दहाच्या पत्र्यांच्या दोन खोल्या. एका खोलीला आतून कडी. दुसऱ्या खोलीलाही कुलूप. घरासमोर लहान मुले खेळत होती. शिवाजी राठोडचे काय झाले, हे तेथील गावकऱ्यांना माहित नव्हते. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्याचे घर कुठंय विचारले असता, ‘तुमचे किती पैसे घेतले’? असे प्रश्न गावकऱ्यांनी केला. त्याने अनेकांचे पैसे घेऊन पळ काढल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजीच्या घरात भाऊ मनोज आणि आई अनुका राहायचे. पण काही दिवसांपासून तेही गावात नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. पुणे पोलिस चौकशीला आले, पण घराला कुलूप कवठे तांड्यावरील शिवाजी राठोड याचे घर शुक्रवारी बंद होते. गावात महा ई सेवा केंद्र चालवणारा त्याचा भाऊ मनोजही घरात नव्हता. पुण्यातील हॉस्पिटलचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुरुवारी रात्री पुणे पोलिस कवठे तांडा येथे येऊन गेल्याचे सांगण्यात आले. साधा कपड्यात पोलिस तांड्यावर फिरत होते. शिवाजी राठोड याच्याविषयी चौकशी करुन माहिती घेऊन गेले. शिवाजी तसा शांत. कोणाला फसवेल असे वाटले नव्हते. वडील राम यांच्या मृत्यूनंतर त्याच्या जबाबदारी आली. तो भिसी चालवत होता. तांड्यातील नागरिकांकडून 1 ते 3 लाख अशी अनेक जणांकडून सुमारे 10 ते 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम त्याने घेतली. पैसे परत करताना आज- उद्या करत राहिला. लोकांचा तगादा वाढल्यामुळे तो गावातून निघून गेला. ओळख लपण्यासाठी दाढी आणि केस वाढवून पुण्यात राहात होता. प्रतिनिधीने त्याचे घर कुठंय विचारले असता, ‘तुमचे किती पैसे घेतले’? असे प्रश्न गावकऱ्यांनी केला. त्याने अनेकांचे पैसे घेऊन पळ काढल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजीच्या घरात भाऊ मनोज आणि आई अनुका राहायचे. पण काही दिवसांपासून तेही गावात नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. शेजाऱ्याला व्यवसायाचे आमिष दाखवून फसवले सोलापुरात विजापूर रोडवरील कुबेर कॉम्पलेक्स येथे शिवा गॅलरी नावाने (गाळा क्र. 10) त्याने दुकान सुरू केले होते. घराशेजारी राहणाऱ्या एकाला त्या दुकानात भागीदार करतो म्हणून शिवाजीने दीड लाख रुपये घेतले. ते दुकानही आता बंद अवस्थेत आहे. तेथे आता पेंटचे दुकान थाटलेले दिसते.
