![]()
ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांनी तरुणांना आभासी जगात रमण्याऐवजी निसर्गातील संगीताचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी निसर्गातील संगीताशी एकरूप होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारत सरकारने नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. या निमित्ताने विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६ च्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ कृषी तंत्रज्ञान संशोधक श्रीरंगदादा लाड, ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा आणि प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला, जिथे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना भिकल्या धिंडा म्हणाले की, तारपा हे वाद्य पिढ्यानपिढ्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गातील घटकांपासून बनवलेले हे वाद्य केवळ एक साधन नसून त्यांचे दैवत आहे. श्वास फुंकून तारपाला जिवंत केले जाते आणि त्याचा नाद ऐकताच शरीर डोलू लागते, पाय थिरकू लागतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी स्वातंत्र्यानंतरही आपली भाषा, संस्कृती, पेहराव आणि विचार विसरत चाललो असल्याची खंत व्यक्त केली. पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीमुळे आपली मूळ ओळख पुसली जात असून, स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. श्रीरंगदादा लाड यांनी संशोधनाधारित शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. ज्वारी, बाजरी व कपाशीवर केलेल्या प्रयोगांतून प्रती एकरी उल्लेखनीय उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. संशोधनाशिवाय शेती कोरडवाहू ठरते, तर संशोधनावर आधारित शेती बागायती बनते, असे त्यांचे मत होते. रघुवीर खेडकर यांनी पद्मश्री पुरस्कारामुळे तमाशा या लोककलेला खरा राजाश्रय मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमास कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सीए (डॉ.) केतन जोगळेकर आणि ममता क्षेमकल्याणी यांची उपस्थिती होती.
तरुणांनी निसर्गातील संगीताशी एकरूप व्हावे:आभासी जगाऐवजी निसर्गाशी जोडले जावे, पद्मश्री भिकल्या धिंडा यांचे आवाहन
