अंध महिलेचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या महिलेस दोन तासांत अटक १२ तासांत दोषारोपपत्र दाखल; नांदेड ग्रामीण पोलिसांची जलद कारवाई
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- सिडको परिसरातील अंध दाम्पत्याचा गैरफायदा घेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला आरोपीस नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करत तत्परतेचे उदाहरण घालून दिले. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ १२ तासांच्या आत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करून पीडित महिलेला परत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ मे २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास सिडको परिसरात अंध फिर्यादी महिला घरासमोर बसून केस विंचरत होत्या. त्यावेळी त्यांनी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून बाजूला ठेवले होते. या परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात महिलेने सुमारे २ ग्रॅम वजनाचे व अंदाजे २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.
दि. १५ मे रोजी सायंकाळी ५.४१ वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ५५८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर आणि पथकातिला उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, सपोउपनि रामकिशन मोरे तसेच अंमलदार अनुराग मुळे, संतोष पवार, असीफ अली, गवेंद्र सिरमलवार व विष्णू कल्याणकर यांनी तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
कावेरी प्र. विकास मोरे (वय २५, व्यवसाय घरकाम, मूळ रा. अंबोली ता. नायगाव जि. नांदेड, सध्या रा. सिडको, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली असून इतर तीन गुन्ह्यांतील सहभागही उघड झाला आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरीचे मंगळसूत्र जप्त केले.अंध महिलेचे चोरी केलेले मंगळसूत्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी त्या अंध महिलेच्या अंध पतीच्या हाताने तिच्या गळ्यात परिधान करायला लावले,हा क्षण त्या दोघांसाठी भावनिक होता. चोर महिलेविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी २४ तासातच न्यायालयात चोरीचे दोषारोप पत्र सादर केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अंध दाम्पत्याला त्वरित न्याय मिळाला असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.
संबंधित व्हिडीओ ..
Post Views: 81
