![]()
पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंचाने बजरंग दलवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. उत्तराखंडमधील कोटद्वार येथे एका मुस्लिम दुकानदाराला दुकानाचे नाव बदलण्यासाठी धमकावल्याच्या घटनेनंतर हे आंदोलन करण्यात आले. कोटद्वार येथे एका मुस्लिम दुकानदाराने आपल्या दुकानाला ‘बाबा’ असे नाव दिले होते. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी त्याला हे नाव बदलण्यासाठी धमकावले आणि दहशत निर्माण केली, असा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. अंजुम इनामदार यांनी सांगितले की, कोटद्वारमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जमाव करून कायदा हातात घेतला. त्यांनी ‘नाव बदला, नाहीतर परिणाम भोगा’ अशा धमक्या दिल्या. या दहशतीला विरोध करत दीपक कुमार नावाच्या व्यक्तीने ‘माझं नाव मोहम्मद दीपक आहे, भारतात नाव आणि धर्मावरून कुणावरही बळजबरी चालणार नाही’ असे ठामपणे सांगितले. संविधानाचा आवाज उठवणाऱ्या दीपक कुमार यांच्यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप इनामदार यांनी केला. उत्तराखंडमध्ये यापूर्वीही ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर अत्याचार, धमक्या आणि मारहाणीच्या घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारकडे बजरंग दलवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली. तसेच, दीपक कुमार यांच्यावर दाखल खोटी एफआयआर त्वरित मागे घ्यावी, त्यांच्या मुलीवर शाळेत लादलेली बंदी हटवावी आणि कोटद्वार येथे पत्रकारांवरील बंदी उठवावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. या आंदोलनात भोला सिंग अरोरा (अध्यक्ष, गुरुद्वारा गणेश पेठ), राजन नायर (ईसाई महासंघ), सगई नायर, भीम आर्मी संघटनाचे प्रदेश नेते ॲड. तोसीफ शेख, ॲड. क्रांती सहाने, आसमा शेख, हलीमा शेख, सलीम मौला पटेल, इब्राहिम यवतमाळवाला, सत्यवान गायकवाड, सलीम शेख, मोईन शेख, गोविंद साठे आदी सहभागी झाले होते.
बजरंग दलवर तात्काळ बंदी घाला:मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांची कोटद्वार येथील घटनेनंतर मागणी
