कोल्हापुरात मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या नेत्याचा राडा:"बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या" म्हणत ईव्हीएम जमिनीवर आपटून फोडले




कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथे शनिवारी दुपारी एकच खळबळ उडाली. “निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत,” अशी मागणी करत एका मतदाराने चक्क ईव्हीएम (EVM) मशीन जमिनीवर आपटून फोडून टाकले. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना (ठाकरे गट) ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. नाधवडे येथील मतदान केंद्रावर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जयवंत वायदंडे हे मतदानासाठी आले होते. त्यांनी सुरुवातीला आपले मतदान केले. मात्र, त्यानंतर अचानक त्यांनी ईव्हीएम मशीन उचलले आणि जोरात जमिनीवर आपटले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेले अधिकारी, कर्मचारी आणि इतर मतदारांची मोठी पळापळ झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निषेधाची अनोखी पण बेकायदेशीर पद्धत जयवंत वायदंडे यांनी या कृतीतून निवडणूक आयोग, शासन आणि निवडणूक विभागाचा जाहीर निषेध व्यक्त केला. “ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवा,” अशी त्यांची भूमिका होती. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी यापूर्वीच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे पोलिस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते, तरीही त्यांनी हे धाडस केल्याने सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांची तत्परता आणि मतदान पुन्हा सुरू घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी सहकाऱ्यांसह वायदंडे यांना घटनास्थळीच झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर तातडीने दुसरे ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आले आणि काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून निवडणूक कार्यात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे ही वाचा… वेळापूर पोलिस ठाण्यात ‘पवार’ गटाचा एल्गार!:कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी खासदार-आमदारांचे ठिय्या आंदोलन, दोन तासांनंतर माघार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान, सोलापूरच्या वेळापूरमध्ये मात्र मतदानाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पोलिस अधिकाऱ्याने एका तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट पोलिस ठाण्यात बेमुदत आंदोलन पुकारले. अखेर संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आश्वासन मिळाल्यानंतर दोन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *