![]()
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. एकीकडे पवार कुटुंबातील सदस्य आणि कार्यकर्ते या दुःखातून सावरत असतानाच, दुसरीकडे राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक आवाहन केले आहे. “जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचा विजय झाला, तरी कोणताही आनंदोत्सव साजरा करू नका,” असे आदेश त्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या सभांसाठी मुंबईहून बारामतीकडे येत होते. मात्र त्यांच्यावर काळाने झडप घातली. आज राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवार ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोशली मीडियावर पोस्ट करत, कार्यकर्त्यांना उपरोक्त आवाहन आणि विनंती केली आहे. सुनील तटकरे यांची पोस्ट जशास तशी… सुनील तटकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, प्रिय सहकारी, उमेदवार आणि पक्षाचे कार्यकर्ते, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आपण सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि दाखवलेल्या शिस्तीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेकडून माननीय अजितदादांच्या विचारांना आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचवेळी, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याच्या निधनामुळे आपण दुःखाच्या काळातून जात आहोत. या पार्श्वभूमीवर ९ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे विजय सोहळे साजरे करताना संयम पाळावा, ही नम्र विनंती आहे. विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणे, रंग उधळणे किंवा कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक जल्लोष टाळावा. दादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे संयम, शिस्त आणि साधेपणा राखणे हेच आहे. ही विनंती सर्वांनी मान्य करून त्याचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. राजकीय विलीनीकरणाची चर्चा दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत ठिकठिकाणी दिसत आहेत. यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी पक्षातील काही ज्येष्ठ नेते विलीनीकरणाबाबत साशंक असल्याचे बोलले जात आहे.
अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा मोठा निर्णय:झेडपी निवडणुकीत विजय मिळाला तरी 'आनंदोत्सव' नाही; सुनील तटकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
