'एल निनो'च्या धोक्यामुळे हिंगोली प्रशासन सतर्क:जलसंधारणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका- जिल्हाधिकारी
![]()
हिंगोली जिल्ह्यात एल निनोच्या पार्श्वभुमीवर जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे सुरु करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. या शिवाय आगामी काळात टंचाई भासणाऱ्या गावांमधून टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एल-निनो प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे, प्रतिक्षा भुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जलयुक्त शिवार, जलसंधारण विभागामार्फत सीसीटी, डीपसीसीटी, गॅबीयन बंधारे, नाला खोलीकरण, रिचार्ज शॉफ्ट, ढाळीचे बांध आदी जलसंधारणाची प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलयुक्त शिवाराची कामे तातडीने पूर्ण करावीत. या सोबतच वृक्षलागवडीची कामेही घ्यावीत. पुढील 15 दिवसांत टंचाई भासू शकणाऱ्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, इसापूर, सिद्धेश्वर, येलदरीसह विविध धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्यात पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे, प्रत्येक शासकीय कार्यालय परिसरात पावसाचे पाणी साठवण व्यवस्था करावी तसेच सर्व कामांचे जीओ-टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पशुधनासाठी संभाव्य चाराटंचाई टाळण्यासाठी आवश्यक चारा नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी बैठकीत दिल्या.
