चौथीतील विद्यार्थिनीच्या छळप्रकरणी शिक्षक अटकेत:गुरु-शिष्य नात्याला काळिमा; शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा
![]()
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छळप्रकरणी धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलगी ही चौथी इयत्तेत शिक्षण घेत असून आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्यावर शाळेत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर धरणगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला. प्राथमिक तपासात काही गंभीर बाबी समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेला सुटी लागल्यानंतर मुलीची तब्येत बिघडल्याने नातेवाईकांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू दरम्यान, या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमध्ये अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा संवेदनशील घटनांमध्ये त्वरित तक्रार देण्याचे आवाहन केले असून आरोपीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.
