हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी अंबादेवी, एकवीरादेवीला साकडे:आयोजकांनी निर्विघ्नतेसाठी पूजा-अर्चा केली
![]()
अमरावती येथील दसरा मैदानात ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निर्विघ्न आयोजनासाठी हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आई अंबादेवी आणि एकवीरादेवीला साकडे घातले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा व आरती केली. आयोजकांनुसार, हिंदूबहुल देशात हिंदूंना घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि वक्फ जिहाद यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर ‘हिंदू राष्ट्र’ हेच उत्तर असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आदर्श हिंदवी स्वराज्याप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करणे हा या सभेचा उद्देश आहे. हिंदू धर्म आणि हिंदूंवर होणाऱ्या आघातांना वाचा फोडण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे. या सभेसाठी भाग्यनगर येथील ‘श्रीराम युवा सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहून हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत. या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निर्विघ्न यशासाठी अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या आई अंबादेवी आणि आई एकवीरादेवीच्या चरणी साकडे घालण्यात आले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पूज्य श्री. अशोक पात्रीकर आणि जिल्ह्यातील साधकांच्या उपस्थितीत देवीची ओटी भरून, या धर्मकार्यात येणारे सर्व अडथळे दूर होऊन सभा यशस्वी व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ही माहिती हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक सचिन वैद्य यांनी दिली.
