एका कॉलमुळे हरवलेल्या वृद्धेचा तीन तासांत शोध:अमरावती मनपाच्या आधार केंद्राची कौतुकास्पद कामगिरी

0
6c01e5d9-a863-4e88-b3dc-50e807784354_1778773476953.jpg




अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या पथकाने हरवलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांत शोधून तिच्या घरी सुखरूप पोहोचवले. या कामगिरीमुळे आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव असून, त्या बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या रहिवासी आहेत. सकाळी ९ वाजता त्या काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या, परंतु सायंकाळपर्यंत परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, पण त्या सापडल्या नाहीत. अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असतानाच, त्यांना आधार केंद्रातून एक फोन आला. आजीबाई सुखरूप असून त्यांना घेऊन येत असल्याची माहिती या फोनद्वारे देण्यात आली. आधार केंद्राच्या चमूने दिलेल्या माहितीनुसार, तुळजाबाई गवई चालत-चालत प्रशांत नगरच्या बागेपर्यंत पोहोचल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या पायाला खोलवर जखम झाली होती. सायंकाळी ७ वाजता त्याच परिसरातील रहिवासी सुचिता कारमोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या फक्त स्वतःचे नाव आणि ‘संजय गांधी नगर’ एवढेच सांगू शकल्या. सुचिता कारमोरे यांनी तात्काळ आधार केंद्राच्या पथकाला फोन करून माहिती दिली की, “शुभम कॉलनीच्या गेटजवळ एक आजीबाई बसली आहे, तिच्या पायाला जखम असून ती स्वतःला तुळजाभवानी गवई सांगत आहे.” ही माहिती मिळताच आधार केंद्राचे पथक शुभम नगर येथे पोहोचले आणि आजीबाईंची विचारपूस केली. त्या फक्त ‘संजय गांधी नगर’ असे सांगत होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि रात्री १०.३० वाजता त्यांच्या घराचा पत्ता लागला. तुळजाबाई आपल्या मुलगी पद्माताई काळपांडे यांच्याकडे राहतात. पद्माताई आणि त्यांचे पती रात्री १० वाजता फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी आधार केंद्राच्या पथकाने फोन करून आजीबाई सुखरूप असल्याची माहिती दिली. घरी परतल्यावर तुळजाबाईंना पाहून कुटुंबाला खूप आनंद झाला आणि त्यांनी आधार केंद्राच्या पथकाचे व अमरावती महानगरपालिकेचे आभार मानले. परिसरातील नागरिकांनीही या तत्पर सेवेचे कौतुक केले. या कार्यात सुचिता कारमोरे यांच्यासह ज्योती राठोड, राजीव बसवनाथे आणि नितीन नांदूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed