'याचाही संतोष देशमुख करा':हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागणाऱ्या कीर्तनकारावर गेवराईत जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने मारहाण

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-14t232541515_1778781389.jpg




गेवराई येथील स्वानंद सेवा गुरुकुलचे संचालक कीर्तनकार कैलास आनंदे यांच्यावर गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून काही व्यक्तींनी लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आनंदे हे आळंदीला जात असताना जातेगाव रोडवर आरोपींनी त्यांना अडवून ही बेदम मारहाण केली असून, हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अखंड हरिनाम सप्ताहासाठी जमा झालेल्या निधीचा हिशोब मागितल्याच्या वादाचे पर्यावसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने धार्मिक आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मारहाणीत कीर्तनकार कैलास आनंदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण मारहाणीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आता तपासाला वेग दिला आहे. ‘याचाही संतोष देशमुख करून टाका,’ अशी धमकी देत आपल्याला जीवघेणी मारहाण केल्याचा दावा जखमी कैलास आनंदे यांनी केला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गावातील तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आनंदे कुटुंबीय प्रचंड दहशतीत असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाची राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आणि बीडच्या पोलिस अधीक्षकांनी तातडीने गंभीर दखल घेऊन संबंधित हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता सामाजिक स्तरावरून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed