![]()
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. रामदास कदम यांची मानसिक स्थिती बिघडली असून ते कुठेही गेले तरी केवळ इतरांना दूषणे देण्याचे काम करतात, अशा शब्दांत जाधवांनी आपला संताप व्यक्त केला. गाढवाला गुळाची चव काय? अशी रामदास कदम यांची स्थिती आहे. त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी चांगली चरित्रे वाचली पाहिजेत, असा खोचक सल्लाही या निमित्ताने दिला आहे. भास्कर जाधव म्हणाले, रामदास कदम याला मी एकेरीच बोलणार असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. माझा मुलगा कष्ट करून मोठा झाला आहे. तुम्ही हप्तेखोर, हप्ते खाता. मुंबईतील बार चा उल्लेख करत जाधवांनी पुन्हा टीका केली. रामदास कदम हा माणूस आहे की कोण हेच कळत नाही. रामदास कदम ही विकृती आहे. खेडमधील सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, सख्या भावाच्या घरात दिवाळीचा दिवा लागला नाही. रामदास कदमने सख्या भावाला जेलमध्ये टाकले होते. रामदास कदम यांची पाप एवढी मोठी आहेत की त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. खाडी पुलावारील कर्जी पुलाचा उल्लेख करताना रामदास कदम यांचा मूर्ख म्हणून उल्लेख करत जाधव यांनी टीका केली. टेंडर निघालेल्या पुलाची अंदाजपत्रक करण्याच्या सूचना रामदास कदम यांनी दिल्या असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला.
गाढवाला गुळाची चव काय?:रामदास कदम ही विकृती, भास्कर जाधवांचा खेडमधून प्रहार
