अनाथ लेकीही अभिमानाने म्हणणार, "मी माहेरी चालले’:पुणे-मुंबई महामार्गावर "माहेरवाशी’ प्रकल्प

0
730-x-548-new-2026-05-11t065148008_1778462555.jpg




ज्या मुलीच्या डोक्यावर आईची माया नाही आणि पाठीशी वडिलांचा आशीर्वाद नाही, तिची व्यथा शब्दांत मांडणे कठीण असते. सासरी गेल्यावर जेव्हा ही मुलगी आपल्या नणंद किंवा जाऊबाईंना माहेरी येता-जाताना पाहते, तेव्हा तिच्या मनात एकच ठसठसणारी कळ उठते, “काहीही असो, माझंही एक माहेर असतं तर…’ अनाथ विवाहित लेकींच्या मनातील हीच आर्त हाक आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेजवळ “माहेरवाशी’ हा अनोखा प्रकल्प आकाराला येत आहे. १८ वर्षांवरील तरुणांनाही आधार तर्पण फाउंडेशन केवळ मुलींसाठीच नाही, तर १८ वर्षे पूर्ण झाल्यावर अनाथालय सोडाव्या लागणाऱ्या तरुणांसाठीही आधारवड बनले आहे. २०२०-२१ मध्ये केवळ २२ तरुणांपासून सुरू झालेला हा प्रवास आज १२६१ तरुणांपर्यंत पोहोचला आहे. त्यांचे शिक्षण, करिअर आणि राहण्याची जबाबदारी संस्था उचलत असून, अनेक तरुण आज सरकारी आणि खासगी नोकऱ्यांत स्थिरावले आहेत. अंधार कितीही दाट असला तरी माणुसकीची एक छोटी ज्योत तो उजळवू शकते. “माहेरवाशी’ प्रकल्प हे त्याचेच जिवंत उदाहरण आहे. जात, धर्म विसरून इथे माणुसकीचे नाते जपले जात आहे. आता या लेकी अनाथ म्हणून नाही, तर “माहेरवाशी’ म्हणून अभिमानाने वावरतील. नात्यांचा ओलावा अन् बापमाणसाचं मिळणार प्रेम हा केवळ विटा-मातीचा निवारा नाही, तर हे एक आशादायी घर आहे. अनाथालयातून बाहेर पडून संसारात पडलेल्या मुलींना जेव्हा माहेरची उणीव भासते, तेव्हा हे केंद्र त्यांच्यासाठी हक्काची ओसरी असेल. इथे त्या वर्षातून दोन-तीन वेळा येऊन राहू शकतील. बाळंतपण असो किंवा दिवाळी, या लेकींचे स्वागत साडी-चोळी, मिठाई आणि मायेच्या ओलाव्याने केले जाईल. या प्रकल्पामागे तर्पण फाउंडेशनचे श्रीकांत भारतीय आणि डॉ. श्रेया भारतीय यांची संवेदनशील दूरदृष्टी आहे. त्यांच्यासोबत वकील अखिलेश चौबे, वेदिका चौबे आणि ३२ संचालक व १७२ सहयोगी संचालक दांपत्ये एका कुटुंबाप्रमाणे या लेकींच्या पाठीशी उभे आहेत. “आम्ही या मुलींच्या डोळ्यांतील अश्रु पाहिले आहेत, ते दूर करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे श्रीकांत भारतीय सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed