वाळू तस्करी व मटका बुकींगचा पर्दाफाश   – VastavNEWSLive.com


वाळू माफिया आणि मटका बुकी पोलिसांच्या जाळ्यात; मोठ्या रॅकेटचा भांडाफोड  

नांदेड/लातूर (प्रतिनिधी)- पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने अवैध धंद्यांविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर जोरदार घाव घातला आहे. या कारवाईत एकूण पाच हायवा गाड्या, जेसीबी मशिन्स, वाळू साठा व इतर साहित्य असा तब्बल दोन कोटी दोन लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजता, माळाकोळी ते खेडकरवाडी रस्त्यावर भारत बेंच कंपनीची एक हायवा गाडी पकडण्यात आली. या गाडीत सुमारे पाच ब्रास वाळू आढळून आली. सदर वाळू नांदेड ग्रामीण पोलीस हद्दीतील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या उपसण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1/6 ऑब्लिक 2026 दाखल करण्यात आला असून सुमारे 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास, नांदेड ग्रामीण पोलीस हद्दीतील मार्कंड शिवारात, मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळ सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा केंद्रावर छापा टाकण्यात आला. पोलिसांचा छापा लागताच संबंधित आरोपी साहित्य सोडून फरार झाले. या ठिकाणी चार हायवा गाड्या, एक जेसीबी मशिन, नदीतून वाळू उपसण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, 67 ब्रास वाळू वाहतुकीचे साहित्य व नदीपात्राबाहेर साठवलेली 60 ब्रास वाळू असा एकूण एक कोटी 82 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, याच विशेष पथकाने यापूर्वी 4 फेब्रुवारी 2026 रोजी लातूर शहरातील शाहू चौक ते गंजगोलाई या गजबजलेल्या परिसरातील गुंडे कॉम्प्लेक्समध्ये मटका बुकींगवर छापा टाकला होता. या कारवाईत बुकी चालक विजय उद्धवराव लांडगे (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक लाख 41 हजार रुपये रोख रक्कम व तीन मोबाईल फोन असा एकूण एक लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.\

तपासादरम्यान विजय लांडगे याच्या कबुलीनुसार या मटका बुकींगचा मुख्य सूत्रधार गोविंद चंद्रसेन खाडप पाटील (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) असून त्याचे लातूर जिल्ह्यात अनेक एजंट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा क्रमांक 8/2 ऑब्लिक 2026 दाखल करण्यात आला असून एकूण 13 एजंटांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या उल्लेखनीय कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवार, तसेच पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांचा समावेश होता. या सर्वांचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रत्येकी 10 हजार रुपये रोख बक्षीस व प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले.

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या ‘खबर’ हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

अवैध वाळू उत्खनन, वाहतूक आणि मटका बुकींगसारखे धंदे समाजव्यवस्थेला पोखरणारे गुन्हे असून यामागे कार्यरत असलेल्या माफियांना आता कुठलाही आसरा मिळणार नाही. कायद्याला गालबोट लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्र होणार असून, अवैध मार्गाने पैसा कमावणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. अन्यथा कायद्याचा चाबूक असा बसेल की पुन्हा उभे राहणेही कठीण जाईल, असा थेट इशारा पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिला आहे.  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *