नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा डॉ विजय कंदेवाड संचालक यांनी घेतला सखोल आढावा


नांदेड – आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आज नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास भेट देऊन नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर सखोल चर्चा करत सेवा अधिक प्रभावी, दर्जेदार व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले.

या बैठकीत सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियानावर विशेष भर देण्यात आला. अभियानांतर्गत जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करून त्यांना वेळेवर व योग्य उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिल्या. सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी तपासणी, समुपदेशन व उपचार या तिन्ही बाबी प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, कुटुंब कल्याण योजना, माता व बाल संगोपन सेवा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम, कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थकेअर तसेच आयपीएचएस मानकांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार राबविण्याचे व गुणवत्ता वाढविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी, सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. शेख बालन, आयुष अधिकारी डॉ. मुरमुरे तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी  श्रीमती रेणुका दराडे उपस्थित होते.

या शिवाय सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे अधिकारी, कर्मचारी व समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे,” असे स्पष्ट मार्गदर्शन आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी यावेळी केले.

Post Views: 16






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *