नागपुरात कॅफेच्या आड हुक्का पार्लरवर मध्यरात्री धाड:‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
8b81ab3d-2cc5-4e71-9aba-b521da1704d8_1778390040535.jpg




नागपूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील ‘नेटफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर मध्यरात्री धाड टाकून हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 82,995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 ग्राहकांवर कारवाई केली आहे. 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील या कॅफेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी सोहेल खान फिरोज खान (22) याच्यासह कर्मचारी आणि ग्राहक हुक्क्याचे सेवन करताना रंगेहात पकडले गेले. ग्राहकांना मानवी जीवितास धोकादायक ठरणारे तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट, विविध फ्लेवर्स, फ्रीझर, फर्निचर आणि अन्य साहित्य जप्त केले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 272 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ आणि अवैध व्यवसायांविरुद्ध ‘ऑपरेशन थंडर’ मोहीम तीव्र केली आहे. गेल्या 12 महिन्यांत (मे 2025 ते मे 2026) शहरात 110 पेक्षा जास्त हुक्का पार्लर आणि अमली पदार्थ संबंधित ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये 250 हून अधिक आरोपींना (पार्लर मालक व व्यवस्थापक) अटक करण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हुक्का पार्लरमध्ये आढळलेल्या 1,200 हून अधिक तरुण-तरुणींवर सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या सुमारे 15 कॅफेचे व्यावसायिक परवाने रद्द करण्याची शिफारस महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed