बंद अमरावती उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला केंद्र सरकारची मंजुरी प्रक्रिया सुरू:लोकसभेत रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी दिली माहिती




अमरावती शहरातील राजकमल आणि जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन तसेच काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या सर्वात जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा विषय केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. शहरातील हा सर्वात जुना रेल्वे उड्डाणपूल गेल्या २५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे शहराच्या इतर रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम तत्काळ सुरू केले जावे, अशी मागणी समाजाच्या सर्वच घटकांकडून पुढे आली आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विषय तांत्रिकदृष्ट्या बडनेरा-अमरावती विभागातील किमी ६७१/१४-१५ येथे असलेल्या जुन्या रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या पुनर्बांधणीसंदर्भातील आहे. हा दोन पदरी आरओबी सन १९६३ मध्ये बांधण्यात आला होता. राज्य प्रशासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेने केलेल्या संरचनात्मक सुरक्षा मुल्यांकन अहवालाच्या (स्ट्रक्चरल ऑडिट) आधारे, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गेल्या पंचवीस ऑगस्टपासून या उड्डाणपुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे. रेल्वे मंत्रालयाने या सर्वात जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अजेंड्यावर घेतले असून ते सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती दिली जाईल. याच मुद्द्यावरून खासदार बळवंतराव वानखडे पुढील आठवड्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. दरम्यानच्या काळात अमरावतीत रेल्वे स्टेशन सुमारे एक किलोमीटर पुढे नेण्याचा पर्याय पुढे आणण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावामागे रेल्वे स्टेशनची जमीन काही खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे लक्षात येताच, हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. आता सरकारने पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्याने रेल्वे स्टेशनचे स्थानांतर जवळपास टळले आहे. खासदार बळवंतराव वानखडे यांनी त्यावेळीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून याबाबतची हमी प्राप्त करून घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *