डॉ. अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान:नितीन गडकरी म्हणाले, जगाला वाचवण्यासाठी शाश्वत मूल्यांची गरज

0
85943cba-d92b-4c34-becc-b31dc06a8c06_1778343908757.jpg




पुणे: वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी, विचार भिन्नता ही समस्या नसून विचारशून्यता ही खरी समस्या असल्याचे मत व्यक्त केले. जगाला वाचवण्यासाठी गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्यासह महाभारत, रामायण आणि भगवद्गीतेतील शाश्वत मूल्ये आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पुण्यभूषण फौंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर केंद्रीय दळणवळणमंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकासमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंबायोसिस शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रसिद्ध व्यावसायिक गजेंद्र पवार आणि पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित होते. या पुरस्काराचे यंदाचे ३८ वे वर्ष होते. या पुरस्काराचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह आणि दोन लाख रुपये रोख रक्कम असे आहे. स्मृतिचिन्हामध्ये बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि पुणे नगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा यांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात जायबंदी सैनिकांचा गौरव करण्यात आला. चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी आणि रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते जवान लक्ष्मण जितेंद्र कुमार, सेलर जितेंद्र सिंह आणि वलसाराजन, द बॉम्ब कॅचर बिनू तसेच फ्लाईंग ऑफिसर वैभव भागवत यांच्या मातोश्री वीरमाता लता प्रल्हाद भागवत यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी ऑटोमोबाईल क्षेत्राचे कौतुक केले. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न या क्षेत्राने पूर्ण केले आहे. भारताने या क्षेत्रात सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून, साडेचार कोटी लोकांना रोजगार देणारे हे क्षेत्र देशाला सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर मिळवून देते. फोर्स मोटर्स हा समूह ‘बिझनेस विथ इथिक्स’ या संकल्पनेचा अवलंब करणाऱ्या मोजक्या उद्योजकांपैकी एक आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. डॉ. अभय फिरोदिया यांच्या ठायी सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता असल्याचे गडकरींनी सांगितले. मूल्याधिष्ठित जीवन आणि एकत्र कुटुंब पद्धती ही आपली बलस्थाने आहेत. २१व्या शतकात गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता हेच खरे भांडवल असून, उद्योग क्षेत्रांनी ही त्रिसूत्री अवलंबण्याची गरज असल्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed