जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण, अमरावतीकरांना आज दुपारनंतर पाणी:सिमेंटऐवजी लोखंडी पाईप बसवला, रात्रभर सेटिंग, सकाळी टेस्टिंग

0
766a3e7c-5bfd-4b54-bd24-3d90478809b2_1778344507090.jpg




अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटलेला पाईप बदलण्यात आल्याने रविवार दुपारनंतर शहराला पाणी मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिली आहे. सिमेंटच्या पाईपऐवजी लोखंडी पाईप बसवण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर पाईपच्या सेटिंगसाठी रात्रभर वेळ देण्यात आला. रविवार सकाळपासून त्याची चाचणी (टेस्टिंग) घेतली जाईल. चाचणी यशस्वी झाल्यानंतर हळूहळू सर्व पाचही वीज पंप सुरू करून जलवाहिनीतून पाणी ओढले जाईल आणि ते अमरावती व बडनेरावासियांना पुरवले जाईल. मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी गुरुवारी दुपारी डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटली होती. यामुळे गुरुवार सायंकाळपासून जुळ्या शहरांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. कंत्राटदारांचा संप सुरू असल्याने दुरुस्ती कार्यात सुरुवातीला अडचणी आल्या. मोर्शी ते अमरावती ही जलवाहिनी तब्बल १५०० मिलीमीटर व्यासाची असून ती जुनी झाल्यामुळे वारंवार फुटण्याच्या घटना घडतात. गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पुन्हा हा प्रकार घडला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ६ मीटर लांब आणि दीड मीटर (१५०० मिमी) व्यासाचा एक पाईप पूर्णपणे बदलण्यात आला आहे.अमरावती शहराचा पाणीपुरवठा लोअर झोन आणि अप्पर झोन अशा दोन भागांत केला जातो. रविवार दुपारनंतर बडनेरा नवी वस्ती, सातुर्णा, म्हाडा कॉलनी, पार्वतीनगर, शिवटेकडी, नागपुरी गेट आदी भागांत पाणी सोडले जाईल. तर, सोमवारी बडनेरा जुनी वस्तीसह पॅराडाईज कॉलनी, शेगाव नाका, नवसारी, विमवि परिसर, भीमटेकडी, मायानगर, साईनगर या भागांत पाणीपुरवठा केला जाणार आहे.मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदारांशी गुरुवारी दुपारपासूनच बोलणी सुरू होती. त्यांची जुनी देयके प्रलंबित असल्याने त्यांनी संप पुकारला होता. नेमक्या त्याच काळात जलवाहिनी फुटल्याने प्रशासनाला त्यांची मनधरणी करून दुरुस्ती कार्य पूर्ण करावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed