निदा खान प्रकरणी आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी:नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला मदत केल्याचा आरोप
![]()
नाशिक येथील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतरण प्रकरणी मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे गट) पोलीस आयुक्तांकडे केली आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान सुमारे ४० दिवस फरार होती. तपासादरम्यान असे समोर आले आहे की, ती छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्या मदतीने लपून बसली होती. मतीन पटेल यांनी फरारी आरोपीला आणि तिच्या कुटुंबाला आश्रय दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २१२, २०१ आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, एमआयएमच्या नेत्यांनी निदा खानचे समर्थन केले असून ते तिच्या पाठीशी उभे राहतील, असे माध्यमांमध्ये जाहीर केले होते. ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे शोषण ही गंभीर बाब असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. जिल्ह्यातून अनेक अल्पवयीन मुली आणि महिला बेपत्ता असून यामध्ये एमआयएमचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, गटनेते किशोर नागरे, नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल, शुभम काळे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
