सुरक्षारक्षकाकडून 4 चिमुकल्यांवर अत्याचाराचा प्रयत्न:कामाच्या पहिल्याच दिवशी नीच कृत्य, पिंपरी-चिंचवडमधील संतापजनक घटना

0
new-project-2026-05-09t162256992_1778324020.jpg




पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण संस्थेमध्ये (सोसायटी) माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्याच्या खांद्यावर सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्याच सुरक्षा रक्षकाने चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, यातील एका १० वर्षांच्या चिमुरडीने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धैर्यामुळे या नराधमाचे पाप उघड झाले असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (८ मे) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना गाठले. “तुम्हाला टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,” असे आमिष दाखवून त्याने या चारही मुलींना सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने या चिमुरड्यांशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. धमकीमुळे मुली हादरल्या, पण ‘तिने’ धैर्य सोडले नाही अत्याचाराचा प्रयत्न केल्यानंतर नराधम दिनेशने मुलींना या प्रकाराबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. “जर कोणाला सांगितले, तर मारून टाकेन,” असे त्याने दरडावून सांगितले. यामुळे लहान मुली प्रचंड दहशतीखाली होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला सातव्या मजल्यावर घडलेली सर्व आपबिती सांगितली. मुलीचे बोलणे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी दिनेश चौधरीला ताब्यात घेतले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू या प्रकरणावर माहिती देताना पोलीस अधिकारी गणेश जामदार म्हणाले, “आरोपीने मुलींना आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले आणि तिथे विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. एका मुलीने आईला माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. आम्ही आरोपीला तात्काळ अटक केली असून त्याच्यावर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.” कामाचा पहिलाच दिवस आणि कृत्य तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित सुरक्षा रक्षकाचा या सोसायटीतील कामाचा तो पहिलाच दिवस होता. यापूर्वी त्याने एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम केले होते. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करताना त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करणे किती अनिवार्य आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पर्वती पायथ्याशी आजोबाचा नातीसोबत घृणास्पद प्रकार दरम्यान, पुण्यातील पर्वती परिसरात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. ७० वर्षांच्या नराधमाने आपल्या सख्ख्या नातीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही सजग नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ धाव घेतल्याने पीडित मुलगी नराधमाच्या तावडीतून सुटली. घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. नसरापूर येथील घटनेनंतर पुण्यातील वातावरण आधीच तापलेले असताना पर्वतीतील या घटनेने आगीत तेल ओतले. संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. “आरोपीला आमच्या ताब्यात द्या,” अशी मागणी करत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed