युवकांनी 'विकसित भारत 2047' चे शिल्पकार बनावे- केंद्रीय मंत्री सिंधिया:डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 18,720 स्नातकांना पदवी
![]()
केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युवकांना ‘विकसित भारत २०४७’ चे शिल्पकार बनण्याचे आवाहन केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (डीपीयू) १७ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात ९ विद्याशाखांमधील एकूण १८,७२० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. सिंधिया म्हणाले की, ‘विकसित भारत २०४७’ च्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी केवळ नोकरीचा विचार न करता परिवर्तनाचे नेतृत्व करावे. आज पदवी घेऊन बाहेर पडणारे हे विद्यार्थीच भारताचे भावी शिल्पकार आहेत. भारत आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून, २०३० पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी सज्ज आहे. चांद्रयान आणि आदित्य एल-१ सारख्या मोहिमांनी भारताची क्षमता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी भूषविले. यावेळी प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील, डॉ. सोमनाथ पी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग (निवृत्त) आणि प्रख्यात प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन गौरविण्यात आले. यावर्षी प्रदान करण्यात आलेल्या पदव्यांमध्ये ४८ विद्यार्थ्यांना पीएच.डी., १६,७५२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, १,९०५ विद्यार्थ्यांना पदवी आणि १५ विद्यार्थ्यांना पदविका यांचा समावेश आहे. तसेच, विविध विषयात प्राविण्य मिळवलेल्या ३० गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले की, २००३ पासून हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी पूर्ण निष्ठेने करावा. या सोहळ्याला मोठ्या संख्येने प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारलेला होता.
