विकास गोगावलेंचा शिवसैनिकांना थेट दम:श्रीवर्धन, म्हसळा आणि दिवेआगारनंतर महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, गद्दारांविरोधात एल्गार
![]()
रायगड जिल्ह्यात शिवसेना अधिक आक्रमक होताना दिसत आहे. बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी संघटनेशी बेईमानी करणाऱ्यांना थेट इशारा दिला. गद्दारी करायची असेल तर तुमचा मार्ग मोकळा आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले. याचवेळी महाड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत खरवली-काळीज ग्रामपंचायतीवरील सत्ता शिवसेनेकडे आल्याने रायगडच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. रायगडमधील बिरवाडी येथे आयोजित सभेत बोलताना विकास गोगावले यांनी संघटनेतील अंतर्गत हालचालींवर थेट भाष्य केले. काही जण संघटनेविरोधात काम करत असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. कोण कोणाशी संपर्कात आहे, कोण कुठे काय बोलतंय, याची आम्हाला पूर्ण माहिती असते. आम्हाला काही कळत नाही, असा गैरसमज कुणी करून घेऊ नये, असे ते म्हणाले. शांत राहतो म्हणजे दुर्बल नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. यावेळी गोगावले यांनी संघटनेतील शिस्त आणि निष्ठेवर विशेष भर दिला. उगाच आम्हाला रुद्रावतार धारण करायला लावू नका. प्रत्येकाने संघटनेचे काम प्रामाणिकपणे करावे. गद्दारी करून संघटनेचे नुकसान करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काही कार्यकर्ते मेहनत घेऊन पक्ष वाढवत असताना त्यांच्याच कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. जर संघटनेत राहून काम करायचं नसेल, तर तुमचा मार्ग मोकळा आहे, असे ठणकावून सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीची आठवण करून देत गोगावले म्हणाले की, संघटना हेच शिवसैनिकांचे बळ आहे. पहिली आपली संघटना आणि नंतर बाकी सर्व, ही शिकवण लक्षात ठेवून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेवर कोणीही रोष काढण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेत अंतर्गत शिस्तीबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, महाड तालुक्यातील खरवली-काळीज ग्रामपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. विकास गोगावले यांनी स्वतः भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. श्रीवर्धन, म्हसळा आणि दिवेआगारनंतर आता महाडमध्येही शिवसेनेने आपली ताकद वाढवल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिवसेना आक्रमक रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये शिवसेना आक्रमकपणे घुसखोरी करत असल्याने आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विकास गोगावलेंच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनेतील गद्दारीला थारा दिला जाणार नाही, हा स्पष्ट संदेश या सभेतून देण्यात आला आहे.
