मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा:फॉरेन्सिक अहवालानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची नवी चौकशी; पायधुनी मृत्यूकांडात वळण
![]()
मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या सामूहिक मृत्यू प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, फॉरेन्सिक तपासात या चौघांच्या शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ हे विषारी रसायन आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या चौघांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. त्यामुळे मृत्यूमागे नेमकं कारण काय, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पायधुनीतील घाटी परिसरातील मोगल उमरेट्टी इमारतीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. मृत्यूपूर्वी या कुटुंबाने बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याची माहिती तपासात समोर आली होती. सुरुवातीला कलिंगडातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, आता फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालात शरीरातील विविध नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळले आहे. यकृत, मूत्रपिंड, प्लीहा, पोटातील अन्नाचे अवशेष, पित्त आणि चरबी यांसारख्या नमुन्यांमध्ये हे विषारी रसायन सापडले आहे. विशेष म्हणजे घरातून जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यातही हेच रसायन असल्याचे स्पष्ट झाले आहे. झिंक फॉस्फाईड हे प्रामुख्याने उंदीर मारण्याच्या औषधात वापरले जाते. त्यामुळे या कुटुंबाच्या मृत्यूमागे अपघात, आत्महत्या की घातपात, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिसांनी घरातून उंदीर मारण्याच्या दोन वड्या आणि एक स्प्रे जप्त केला आहे. यातील वड्यांचे पाकीट सीलबंद अवस्थेत होते, तर स्प्रे वापरलेला असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. मोगल उमरेट्टी इमारतीत मोठ्या प्रमाणात उंदरांचा त्रास असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हे विषारी रसायन अन्नात कशा प्रकारे मिसळले गेले, हा तपासाचा मुख्य मुद्दा ठरत आहे. या प्रकरणात आता सर जे.जे. रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सखोल वैद्यकीय अभ्यास करणार आहे. पोलिसांकडून फॉरेन्सिक अहवाल तज्ज्ञांकडे सुपूर्द करण्यात येणार असून, मृत्यूची अंतिम कारणमीमांसा या अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विषबाधेचे स्वरूप, शरीरावर झालेला परिणाम, प्रकृती बिघडण्याचा वेग आणि मृत्यूपर्यंतची वैद्यकीय प्रक्रिया या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. तसेच मृत व्यक्तींना इतर कोणते गंभीर आजार होते का, याचाही तपास या प्रक्रियेत होणार आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उपचारादरम्यान अब्दुल्ला आणि आयशा यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, आत्महत्या किंवा कुणावर संशय असल्याचा कोणताही उल्लेख त्यांनी केला नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विषारी पदार्थ शरीरात नेमका कसा गेला, तो जाणूनबुजून मिसळण्यात आला का, की ही एखादी दुर्घटना होती, याचा तपास सुरू आहे. सर्वांचे लक्ष तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंतिम निष्कर्षाकडे जे.जे. मार्ग पोलिसांनी आतापर्यंतच्या चौकशीत कोणतीही ठोस संशयास्पद बाब समोर आली नसल्याचे सांगितले आहे. तरीही फॉरेन्सिक आणि डॉक्टरांच्या अंतिम अहवालानंतरच या प्रकरणाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मुंबईत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंतिम निष्कर्षाकडे लागले आहे.
