मुंबई विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची धडक:मोठा अपघात टळला, सर्व प्रवासी सुखरूप; डीजीसीएकडून चौकशीचे आदेश




मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमानांच्या पंखांची धडक झाली असून यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेने विमान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गर्दीच्या वेळी टॅक्सीवेवर घडली, ज्यात प्रवाशांनी भरलेल्या दोन लहान विमानांचा समावेश होता. विमानतळ सूत्रांनुसार, गर्दीच्या धावपट्टीवरून मार्गक्रमण करत असताना दोन्ही विमानांचे पंखांचे टोक एकमेकांना घासले गेले. यात पंखांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अधिकची माहिती अशी की, यातील एअर इंडिया AI 2732 हे विमान मुंबईहून कोईम्बतूरसाठी उड्डाण करण्याच्या तयारीत होते. विमान प्रस्थानासाठी आपल्या गेटवरून ते पुढे जात होते. तर इंडिगो 6E791 हे विमान हैदराबादहून आले होते. सुरक्षित लँडिंगनंतर विमान आपल्या निर्धारित पार्किंग बेकडे जात होते. याच वेळी दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना धडकले. डीजीसीएकडून चौकशीचे आदेश दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेची दखल घेतली असून, औपचारिक चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन्ही विमान कंपन्यांनी नियामक प्राधिकरणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *