खा.लंके पुणे येथील रुग्णालयात दाखल:अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय
![]()
निर्जलीकरण आणि अन्नातून विषबाधा झाल्यामुळे खासदार नीलेश लंके यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असतानाही लंके यांनी कामाचा धडाका सुरूच ठेवला होता, मात्र थकवा वाढल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले. तमिळनाडूतील जिंजी किल्ला मोहिमेनंतर कोल्हापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या खा. लंके यांना तिथे हॉटेलमधील जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. ३ मे रोजी गावी परतल्यानंतरही त्यांनी विश्रांती न घेता नाशिक, संगमनेरसह जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. सोशल मीडियाद्वारे संवाद साधताना खा. लंके यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचे सांगून लवकरच जनसेवेत परतण्याचा विश्वास व्यक्त केला. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही रुग्णालयात त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. रुबी हॉलमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी शुक्रवारी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या.
