"राजकमल उड्डाणपुलाचा खोळंबा; संथ कामावरून काँग्रेस आक्रमक:शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा ठपका
![]()
रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपुल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे एकूणच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ८ रोजी अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. भेटीदरम्यान शिष्टमंडळाने पुल बंद राहिल्यामुळे परिसरातील व्यापार, दळणवळण आणि नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाची तीव्र नाराजी व्यक्त करीत नेमके काम केव्हा सुरू होणार, नागरिकांना दिलासा कधी मिळणार, असा जाब विचारला. शिष्टमंडळाने यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या पुढील कामाबाबतचे नियोजन आणि वेळापत्रक सामान्य नागरिकांपासून गुप्त ठेवण्यात येत असल्याबाबत रोष व्यक्त केला. उड्डाणपुलासाठी एकूण १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून,रेल्वे विभागाच्या भागाची पाडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .मात्र, राज्य शासनाच्या हद्दीतील चारही बाजूच्या (विंग) भागाची पडण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही आणि निविदा प्रक्रियाही झालेली नाही. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच महानगरपालिकेतील संबंधित ठरावही सोबत जोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.शिष्टमंडळाने आग्रहपूर्वक मागणी केली की, उड्डाणपुलाचे काम जास्तीत जास्त वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तात्काळ समन्वय साधावा, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर कमी होईल.याप्रसंगी प्रामुख्याने कॉंग्रेस शहराध्यक्ष बबलु शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, संजय वाघ, संजय शिरभाते, सुरेश रतावा, नितिन काळे, विक्की वानखडे, अनिकेत ढेंगळे, अक्षय नरगडे, बिलाल भाई, विजय अटळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुलाचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागणार पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून तीन वर्षे लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी याप्रसंगी दिली. इर्विन चौकातील वाहतुकीची समस्या सोडवण्याची मागणी करत इर्विन चौकातील दळणवळणाची स्थिती अत्यंत भयावह होत असल्याचे लक्षात आणून देत, डॉ. पंजाबराव देशमुख बँकेसमोरील बंद केलेला डिव्हायडर तत्काळ उघडण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. यास कार्यकारी अभियंता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता सुरक्षा समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले.
