उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

0
app_177825065169fdf39bb2e82_1358407.jpg




प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर सायंकाळी ६ नंतर प्रशासनाला जाग आली आणि मार्ग मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी मोहोळ येथील पुलावर जाण्यासाठी रॅम्पची सोय केलेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बनवलेला सर्व्हिस रोड सध्या अवजड वाहतुकीमुळे जीवघेणा ठरत आहे. शुक्रवारी सकाळी माल ट्रक पलटी झाल्यानंतर एनएचएआयच्या कर्मचाऱ्यांनी ट्रक मालकाकडे माल भरण्यासाठी दुसऱ्या ट्रकची मागणी केली. मात्र, ट्रक उपलब्ध न झाल्याने तोपर्यंत अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवण्याचे कष्ट घेतले नाहीत. यामुळे टोल देऊनही प्रवाशांना दिवसभर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी तातडीने एनएचएआय अधिकाऱ्यांना विचारणा केली. विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी पांडे यांना सायंकाळपर्यंत ही गाडी तेथेच अडकून पडल्याची माहितीही नव्हती. एनएचएआयचे कर्मचारी वरिष्ठांना अंधारात ठेवून अशा प्रकारे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. सकाळी सहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून सर्व्हिस रोडवर माल ट्रक पलटी झाला होता. ही गाडी दिवसभर तेथून काढण्यात आली नाही. सायंकाळी साडेसहा नंतर माल दुसऱ्या गाडीत भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत नागरिकांना आणि प्रवाशांना या गलथान कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. प्रमोद डोके, नगरसेवक, नगरपरिषद मोहोळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *